Advertisement

चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक!

प्रजापत्र | Saturday, 02/09/2023
बातमी शेअर करा

जळगाव - ४० वर्षानंतर तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आवक नाही आणि ग्राहकही नाही, अशा परिस्थिती बाजाराची श्वासकोंडी झाली आहे. १८५ ते १९० प्रतिकिलोने तूरदाळ जळगावच्या बाजारात विक्री होत असून त्यासोबतच चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनादाळही महागाईच्या चुलीवर जाऊन बसली आहे. 

गेल्या हंगामात तुरीची लागवड घटली. खान्देशात सर्वाधिक कापसाची लागवड झाली. तर मराठवाडा, विदर्भातही कापूस, सोयाबीनला अनेकांनी पसंती दिली.त्यामुळे तुरीची लागवड घटली. त्यामुळे यंदा तूरदाळ दोनशे रुपयांवर पोहोचते की काय, याचीच भिती व्यक्त होऊ लागली आहे.४० वर्षानंतर तूरदाळीने दरवाढीचा उच्चांक गाठल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत तूरदाळीने भाव घेतला होता. त्यातुलनेत सध्याचे दर उच्चांक गाठणारा असल्याचे सांगण्यात आले.

 

जळगावची निर्यात घटली
सध्या तूरदाळीची आवक घटली आहे. नवे उत्पादन जानेवारीपर्यंत येईल. तोपर्यंत जळगावच्या ७५ दाल मिलच्या माध्यमातून अन्य दाळींवर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जळगावहून देशभरात दाळी निर्यात होतात. सध्या तूरदाळ महागल्याने तिच्यावर होणारी दैनंदिन प्रक्रिया कमी प्रमाणात केली जात आहे. दरम्यान,  दाळींसह वाटाणे, चने महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे आवक कमी असताना दुसरीकडे ग्राहकही नसल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी कोंडी झाली आहे.

 

दरवाढीचा तुलनात्मक आढावा (प्रतिकिलो)
डाळ-पूर्वीचे दर-सध्याचे दर

तूरडाळ-१६०-१८५
मूगडाळ-१००-१०७
चनाडाळ-६०-७५
चने-१६२-१७०
वाटाणा-७५-८०

 

कोट
५० वर्षांपासून या व्यवसायात आहे. तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. या भाववाढीवर सरकारचे नियंत्रण असायला हवे.स्वस्त दरात तुरीची डाळ आयात करून भाव नियंत्रण करायला हवेत. तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
-विजयकुमार रामदास वाणी, विक्रेते.

 

पाऊस नाही. लागवड कमी आहे.पंधरवाड्यात दमदार पाऊस झाल्यास उत्पादनात वाढ होईल. सध्या तूरदाळीची मागणी कमी असल्याने अन्य उत्पादनावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
-प्रेम कोगटा, अध्यक्ष, दाल-मिल असोसिएशन.

Advertisement

Advertisement