Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - एक पाऊल पुढे

प्रजापत्र | Saturday, 02/09/2023
बातमी शेअर करा

देशात भाजपच्या म्हणण्यापेक्षा मोदी-शहा जोडीच्या समोर ताकदीचे राजकीय आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीने आणखी एक पाऊल उचलले आहे. मुंबईत झालेल्या इंडिया च्या बैठकीत आघाडीने आपली समन्वय समिती नेमली. ज्या शरद पवारांच्या संदर्भाने सातत्याने संभ्रम निर्माण केला जात होता, त्या शरद पवारांचा समावेश समन्वय समितीत आहे. बहुतांश मोठ्या पक्षांना यात स्थान देऊन 'इंडिया' ने एक पाऊल पुढे टाकले आहे.

 

देशातील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीने अखेर आपली समन्वय समिती जाहीर केली आहे. सुरुवातीला जेंव्हा मोदी या आघाडीची संभावना करीत होते किंवा टर उडवित होते, त्याच मोदींना आणि अमित शहांना या आघाडीने अस्वस्थ केले आहे हे तर स्पष्ट आहे. त्यामुळेच असेल कदाचित, आता विरोधकांना पुरेसा वेळ मिळू नये यासाठी लोकसभेच्या निवडणूका मुदतीपूर्वीच घेण्याच्या देखील हालचाली सुरु आहेत. संसदेच्या बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात नेमके काय असेल हे देशाला माहित नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांना असे कोणाला विश्वासात घेऊन काही करण्यापेक्षा काहीतरी धक्कादायक वाटावे असे करण्यात आनंद वाटतो, त्यामुळे मोदींच्या पिटा-यातून विशेष अधिवेशनात काय निघणार हे आताच कळणार नाही. मोदी समान नागरी संहितेबाबत काही निर्णय घेणार, का 'वन नेशन वन इलेक्शन' चे घोडे दामटणार हे कळायला आणखी दिवस जाऊ द्यावे लागतील . पण या पिटा-यातून काहीही निघणार असले तरी तो इंडिया आघाडीचाच परिपाक असणार आहे. 'इंडिया' आघाडी जसजशी अधिक मजबुतीने पुढे येताना दिसत आहे, तसे केंद्राच्या हालचाली वाढल्या आहेत. या आघाडीला निव्वळ चेष्टेत दुर्लक्षित येणार नाही हे एव्हाना भाजपला समजले आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीला विरोध करण्याचे प्रयत्न सुरु होतील. भाजप सत्तेसाठी आणि राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर उतरु शकतो, हे यापूर्वी अनेकदा समोर आलेले आहे. या पक्षाच्या सरकारने देशात सुरु केलेले सुडाचे राजकारण नवीन नाही, त्यामुळे इंडिया आघाडीतील समन्वय तोडण्यासाठी देखील भाजपकडून हालचाली होतीलच. पण आघाडीने सुरुवातीला १४ सदस्यांची समन्वय समिती नेमून काम तर सुरु केले आहे. आघाडीचे आणखी एक पाऊल तर जोरदार पडले आहे. काँग्रेसकडून स्वतः मल्लिकार्जुन खर्गे हे या समितीत आहेत. खर्गे यांच्यातील पोक्त राजकारणी यापूर्वी देशाने अनुभवला आहे. खर्गे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षातील अनेक वादांवर जो समन्वय करून दिला यातून त्यांच्यातील वेगळेपण दिसलेले आहे. पक्षाच्या मोठेपणाचा फारसा आव न आणताही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे भरपूर प्रयत्न भाजपकडून झाले. आज देशाच्या राजकारणात सर्वांना एकत्र जोडण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्येच आहे, त्यामुळे शरद पवार इंडिया सोबत नसावेत ही भाजपची आंतरिक इच्छा होती. त्यामुळेच अजित पवारांना बंड करायला भाग पडले गेले. यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करता आला तर भाजपला ते करायचे होते. मात्र आज तरी भाजपला यात यश आलेले नाही. बाकी तृणमूल, आरजेडी, जेडीयू, तामिळनाडूतून द्रमुक, डावे पक्ष, महाराष्ट्रातून शिवसेना (उबाठा ) सारे सोबत असल्याने इंडिया आघाडीची शक्ती वाढलेली आहे. द्रमुक, तृणमूल, जेडीयू, आरजेडी या पक्षांना स्वतःच्या ताकदीवर राज्यांमध्ये सत्ता आणण्याचा अनुभव आहे. त्यांनी ती क्षमता सिद्ध केलेली आहे. भाजपच्या दादागिरीला समर्थपणे तोंड दिलेले आहे. नॅशनल कॉन्फरन्स, आप, सपा हे सोबत आहेत आणि त्यामुळेच ही आघाडी उद्या समर्थ पर्याय म्हणून समोर येऊ शकते असे चित्र आज निर्माण झाले आहे. अर्थात आघाडीचे आणखी एक पाऊल चांगले पडलेले असले तरी त्यांचा प्रवास सहज सोपा असेल असे नाही. या समन्वयाचा बिघाड व्हावा यासाठी भाजप प्रयत्न सोडणार नाही. त्यामुळेच आघाडीतील संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना स्वतःला आवरावे लागेल. तसेच एकमेकांबद्दलचा विश्वास अधिक वाढविण्यासोबतच आप सारख्या पक्षांना प्रादेशिक नफा तोटा बाजूला ठेवून देशाचा व्यापक विचार करावा लागणार आहे आणि हे करताना अर्थातच काँग्रेसला घरातल्या कर्त्या व्यक्तीची भूमिका घ्यावी लागेल. कर्ता व्यक्ती जसा घरात स्वतःच्या लेकरांकडे काहीसे दुर्लक्ष करतो पण भावाच्या लेकरांचे लाड अगोदर पुरवितो आणि म्हणूनच घर टिकते, त्या भूमिकेतून खर्गेंना जावे लागेल.

Advertisement

Advertisement