Advertisement

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

प्रजापत्र | Friday, 01/09/2023
बातमी शेअर करा

जालना - जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. हे आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, धुळे-सोलापूर महामार्गावर 3 गाड्या पेटवण्यात आल्या, तसेच 10-15 गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याचे समजते आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचेही समजते आहे.

 

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांची परिस्थिती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण मागे घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

नेमके काय घडले?

 

बेमुदत उपोषण स्थळी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिसांचा मोठा राडा झाला. या दरम्यान बाचाबाची होऊन या ठिकाणी दगडफेक, लाठी चार्ज झाला. गावातील आनेक नागरिक जखमी झाले, पोलिस देखील जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी तालुका 1 रोजी गालबोट लागले. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली यात तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलिस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.

 

 

 

3 जिल्ह्यांतील गावांमध्ये बंद

 

मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाला सुरूृुवात केली आहे. मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू असून मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील आणि शेजारीत तीन जिल्ह्यांतील अनेक गावांनी कडकडीत बंद पाळला आहे.

 

 

 

ग्रामसभेत ठराव

 

जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीसह जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी बंद पुकारला. वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तिर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, कोळगाव, मांजरसुंबा, गोंदी, धोंडराई या गावातील व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी बंद पुकारत उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचाही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वडीगोद्री ग्रामपंचायतीने गुरुवारी ग्रामसभेत ठराव घेऊन कडकडीत बंद पाळला.

 

 

 

गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह

 

जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावे असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.

 

 

 

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटे आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.

Advertisement

Advertisement