पुणे - पुण्यात कधी, कोण आणि कशासाठी काय करेल याचा काही नेम नाही. काही दिवसांपासून पुण्यातील चोरदेखील चोरीसाठी नव्या शक्कल लढवताना दिसत आहे. मात्र खास तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी करत असलेल्या चोराला अखेर पोलिसांनी पडकलं आहे. पोलिसांनी या चोराकडून 27 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तर चोरलेली 11 लाखांची रोकड त्याने ऑनलाइन जुगारात उडवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मनीष जीवनलाल राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून 11 लाखांची रोकड आणि 55 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख 50हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण करीत मनीष राय याला अटक केली. तो मूळचा मध्यप्रदेशच्या कटणी येथील आहे. अधिक माहितीनुसार, आरोपीला मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्याची सवय आहे. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. परंतु घरफोडीत चोरलेली 11 लाख रुपयेही तो जुगारात हरला. घरफोडी करुन तो अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट
पुण्यातच नाही तर पुणे जिल्ह्यात सध्या चोरांचा चांगलाच सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक चोर नव्या नव्या शक्कल लढवून चोरी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत रात्रीत घरफोड्या झाल्या होत्या. बारामती शहरातील देसाई इस्टेट जवळ आणि बारामती शहरात एका रात्रीत चोरट्यांकडून तब्बल 15 ते 16 घरफोड्या झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सोने चांदी रोख रक्कम चोरीगेली होती. चोरट्यांनी बंद घरे फोडली आहेत. या चोरीत जवळपास 25 तोळे सोने चांदी आणि 1 लाख रुपये कॅश लंपास केली होती. एकाच रात्रीत एवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. कधी गाड्या, कधी घरफोड्या तर कधी चक्क पोलीस ठाण्याचा आवारातूनच जप्त केलेल्या गाड्यांचे लोगो चोरीची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे अशा भुरट्या चोरांना पकडण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र पोलिसांकडून या चोरांना पकडण्यात काही प्रमाणात यश आल्याचं दिसत आहे. गाड्या चोरणाऱ्या आणि नंतर आता जुगारासाठी चोरी करणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.