Advertisement

नितीन गडकरींना INDIA मध्ये सामील होण्याची ठाकरे गटाकडून ऑफर

प्रजापत्र | Sunday, 20/08/2023
बातमी शेअर करा

 आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बहुतांश विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपविरोधात कंबर कसली आहे. यासाठी विविध राज्यांतील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची घोषणा केली आहे. यात राज्यातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन महत्वाच्या पक्षांचा देखील समावेश आहे. दरम्यान, अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी चक्क भाजपचे महत्त्वाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनाच इंडियात सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. भाजपकडून गडकरी यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांनी इंडियात सहभागी व्हावेत असे राऊत म्हणाले. 

 

 

काय म्हणाले विनायक राऊत? 
या देशातील एकमेव कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सर्वजण ज्यांना पाहतो ते नितीन गडकरी उद्या पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात. त्यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्वाने नितीन गडकरी यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आमच्यासारखे नितीन गडकरी यांच्यावर प्रेम करणारे अनेकजण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे याचं सर्वानाच दुःख होत आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी यांच्या दबावाखाली न राहता सत्तेला लाथ मारून इंडिया आघाडीत येण्याची विंनती मी गडकरी यांना केली असल्याचे विनायक राऊत म्हणाले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आणि गडकरी यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

 

पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले आहे की, नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीत यावे याबाबत मी माझे मत मांडले आहेत. मात्र, यावर इंडिया आघाडीचे नेते निर्णय घेतील. तर मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे. मग, शरद पवार पंतप्रधान झाले किंवा गडकरी पंतप्रधान झाले तरीही उद्धव ठाकरे त्यांचे स्वागत करतील असे विनायक राऊत म्हणाले. तर,पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवशाहीची राजवट आलीच पाहिजे, असेही राऊत म्हणाले.      

Advertisement

Advertisement