Advertisement

पावसाचे होणार आगमन?

प्रजापत्र | Friday, 18/08/2023
बातमी शेअर करा

पावसाअभावी महाराष्ट्रात दुष्काळाचे ढग गडद झाले आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वांच्याच नजरा वरूणराजाकडे आहे. दिलासादायक म्हणजे, हवामान विभागाने राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आज (ता.18) विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

पावसासाठी पोषक हवामान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सक्रिय होऊन पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान आहे. उकाडाही जाणवत आहे. पावसासाठी हे पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

पूर्वेकडील राज्यात जोरदार बरसणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर समुद्र सपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्याच्या प्रभावामुळे आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे बंगालचा उपसागर, पूर्व भारतातील राज्यांत ढगांची दाटी झाली असून येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement