बीड : ज्यांना सत्तेसोबत जायचे त्यांनी खुशाल जावं पण भाजपसोबत जाणारांना निवडणुकीत कुठे पाठवायचे हे जनताच ठरवेल, लोकशक्तीच तुम्हाला उलथून टाकेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात बीडपासून केली असून बीड येथे त्यांची स्वाभिमान सभा झाली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड,राजेश टोपे, आ. रोहित पवार,जयसिंग गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,सक्षणा सलगर, फौजीया खान,कॉंग्रेसचे अशोक पाटील, राजेसाहेब देशमुख,यांची उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले की, समाजामधील अंतर वाढविण्याचे काम सत्ताधारी करित आहेत. आज समाजासमोर महागाईसह अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहे ,मणीपूर जळतेय,स्त्रीयांची धिंड काढली जातेय पण सरकारला याची कशाचीच चिंता नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणीपूरला जायला हवं होतं, पण त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. हे लोक लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडत आहेत. हे बदलायचं असेल तर वेगळा विचार करावा लागेल.दवाखान्यात १८ लोक मृत्यूमुखी पडतात आणि सरकार बघ्याची भूमिका घेतय. सत्तेचा गैरवापर करुन, लोकांना तुरुंगात डांबून राजकारण करणार असाल तर लोकशक्ती तुम्हाला उलथून टाकेल. अमरसिंग पंडितांनी सांगितल पवारांच वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलय. सत्तेच्या बाजूला जायचं असेल तर जा, पण त्यांच्याकडून काही घेतलं, त्यांच्याबद्दल किमान माणुसकी तर ठेवा. असेही पवार म्हणाले.
जयंत पाटील यांनी सत्तेसाठी काहीही करणारे लोक आता सत्तेवर असल्याचे सांगितले. देशात सुडाचे राजकारण सुरु आहे, राज्यभरात जातीय तणाव वाढविला जातोयअसे सांगितले हे थांबविले पाहिजे असे सांगितले. आ. रोहित पवार आम्ही सर्वजण विचारासोबत आहोत. संघर्ष करावा लागणार आहे. विचारांसाठी आम्ही कोणालाही घाबरणार नाही. महाराष्ट्रातील सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही असे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार हाच पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव चेहरा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर यांनी राजकारणात भूमिका फार महत्वाची असते. आम्ही काहीही झालं तरी शरद पवारांसोबत हीच भूमिका आजपर्यंत जपली आहे.आमदार झाल्यावर झाले नाहीत तितके सत्कार जिल्हाध्यक्ष म्हणून झाले. प्रत्येक बैठकीचे रुपांतर सभेत झाले ही शरद पवारांची जादु आहे. सर्वसामान्य लोक शरद पवारांसोबत आहेत. इथली जनता स्वाभिमानी आहे. लोक गद्दारी करणारांना जागा दाखवून देतील असे सांगितले.
महेबूब शेख यांनी बीड जिल्हा शरद पवारांच्या पाठिशी पुन्हा ठामपणे उभा राहिल असे सांगितले. प्रास्ताविक सय्यद सलीम यांनी केले. यावेळी बबन गिते (परळी), शिवराज बांगर, सुशीला मोराळे ( बीड), शेख मंजूर ( माजलगाव) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.