औरंगाबाद - पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांवर भाष्य केलं आहे. "मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही", अशा शब्दांत त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे.
पुण्यातील दोन्ही पवार काका-पुतण्यांमधील भेट ही कौटुंबिक भेट होती असं शरद पवार सातत्यानं सांगत आहेत. पण या भेटीची माहिती माध्यमांपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली आणि त्याचा हेतू काय होता? या सवालावर बोलताना शरद पवार म्हणाले, "मी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरुन गेलो. माझ्या गाडीची काचही खालीच होती तिथं पोहोचल्यानंतर मी बुकेही स्विकारला, हे माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील पाहिलं. माझ्या स्वागतानिमित्त दिलेली फुलं मी घेतली नंतर मी पुढे गेलो त्यामुळं मला कोणाची भीती असण्याचं कारण नाही"
या भेटीदरम्यान शरद पवार खुले पणानं गेले पण अजित पवार गुप्त पद्धतीनं दाखल झाले यातून आपण काय मेसेज दिला? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "कोण कशा पद्धतीनं आलं यावर मी सांगणार नाही मी फक्त माझ्या पुरत सांगू शकतो. बाकी लहान लोकांच्याबाबत मी भाष्य करत नाही" अशा शब्दांत शरद पवारांनी अजितदादांवर निशाणा साधला.