ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून हा देश स्वतंत्र झाला, त्याला आता ७६ वर्ष झाली आहेत. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील आपण मागच्या वर्षी साजरा केला. आज एक स्वतंत्र, सार्वभौम देश म्हणून आपण जगात सन्मानाने ओळखले जातो याचा अभिमान आहेच. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्याशी नसतो , तर मुलभुत अधिकारांचे, सन्मानाने जगण्याचे आणि आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य असे अनेक पैलू स्वातंत्र्य या संकल्पनेसोबत जोडले गेलेले आहेत, त्या प्रत्येक पैलूचे काय झाले याचे आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. ब्रिटिशांच्या तावडीतून, गुलामगिरीतून हा देश मुक्त झाला , त्याला आता ७६ वर्ष झाली आहेत. या मुक्तीसाठी जो प्रदीर्घ लढा येथील जनतेने टिळक , गांधी , नेहरू, पटेल आझाद अशा अनेकांच्या नेतृत्वात उभारला, या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग , राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, त्यातूनच आम्ही हे स्वातंत्र्य मिळवू शकलो . आमच्या देशावर राज्य करण्याचा अधिकार आमचा आहे, या भावनेतून आम्ही १९४७ ला राजकीय स्वातंत्र्य मिळविले . हे मिळविण्यासाठी अनेकांचा त्याग आहे, मात्र त्याची जाणीव आजदेखील सर्वांना आहे असे म्हणता येणार नाही.
आपण जे स्वातंत्र्य मिळविले ते राजकीय स्वातंत्र्य होते. आपल्या देशासाठी कायदे करण्याचा, आपल्या देशावर राज्य करण्याचा अधिकार या स्वातंत्र्याने प्रत्येकाला दिला त्याचा अभिमानच आहे. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरता सीमित नक्कीच नव्हता, किंवा स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य असे अपेक्षित नव्हते. तर सन्मानाने जगण्याच हे स्वातंत्र्य , आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य असे बहुविध स्वातंत्र्य या देशाला अपेक्षित होते. १९४७ पासून जी जी म्हणून सरकारे आली, त्यांनी कमीअधिक फरकाने यासाठी प्रयत्न केले, म्हणूनच आज जगात भारताला सन्मानाचे स्थान मिळाले आहे. या वाटचालीत आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली, भारतासारख्या मोटरख्या देशाने स्वीकारलेली लोकशाही व्यवस्था टिकेल का असा संशय ज्यावेळी तत्कालीन पुढारलेली राष्ट्रे व्यक्त क्रिया होती, त्यावेळी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाने या देशात लोकशाही रुजू शकते हे दाखवून दिले. ही वाटचाल कशी असावी याची पायवाट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आखून दिली आणि त्यामुळेच आपला आजपर्यंतचा प्रवास होऊ शकलेला आहे.
स्वातंत्र्यावेळी ज्या देशाकडे मोजकी संसाधने होती, बोटावर मोजण्याइतक्याच सुविधा होत्या, त्या देशाने आज वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक कीर्तिमान सतःपित केले आहेत. व्यापार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये आज आपण जी प्रगती साधली आहे, त्यामागे आतापर्यंतच्या सर्व लोकनियुक्त सरकारांचा कमी अधिक वाटा राहिलेला आहे. मात्र आपण ही जी प्रगती करू शकलो त्यामागे आपण जपत आलेल्या सामाजिक, धार्मिक सौहार्दाचा मोठा सहभाग राहिलेला आहे. ज्या ज्या काळात हे सौहार्द टिकून राहिले त्या त्या काळात आपण प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने पाऊले टाकत राहिलो. सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने जी वाटचाल आपण करीत आहोत, त्याचा पाया सामाजिक, धार्मिक सौहार्द आहे आणि म्हणूनच आज स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडताना तो पाया अधिक भक्कम करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.
आपण विविध क्षेत्रात प्रगती केली हे वास्तव असले तरी अजूनही आपल्यासमोरची आव्हाने कमी झालेली नाहीत. गरीब श्रीमंतांमधली दरी कमी होण्याऐवजी वाढत आहे. औद्योगिकीकरण वाढले असेल तरी बेकारी, बेरोजगारी देखील तितक्याच वेगाने वाढत आहे. एकीकडे आपण जगातील प्रमुख अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहत आहोत आणि त्याचवेळी आपल्या अर्थव्यवस्थेलाच अनेक धक्के बसत आहेत. आज रिझर्व्ह बँकेला सर्वच बँकांना सीआरआर वाढवायला सांगावा लागतो, म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेसमोर तरलतेने आव्हान किती तागडे असेल हे लक्षात येऊ शकते. सामाजिक न्यायाच्या बाबतीत असेल किंवा सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सेवा पुरविण्याच्या बाबतीत आपण जगाच्या तुलनेत अजूनही बरेच मागे आहोत. आदिवासी, वनवासी यांचे शोषण , त्यांच्या संसाधनांचे शोषण असे अनेक विषय आजदेखील आपल्यासमोर उभे आहेत आणि त्यावर बोलण्याऐवजी आम्ही तरुणाईला धार्मिक विद्वेषाच्या आगीत फेकणार असू, आजही गरिबी, बेरोजगारी, शिक्षण ,आरोग्याचे प्रश्न असतानाही आमची राज्ये धार्मिक, वांशिक , जातीय हिंसाचारातून जळत असतील आणि सरकार नावाची यंत्रणा हातावर हात ठेवून मुकदर्शक बनणार असेल तर आपल्या सार्वभौमतेलाच ते उद्या आव्हान असणार आहे. याचा देखील विचार आज करणे आवश्यक आहे. 'केवळ हर घर तिरंगा ' घोषणा देऊन, त्याची डायलर टोन वाजवून, किंवा सेल्फी विथ तिरंगा काढून देश बदलणार नाही, देशवासियांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत राहावी यासाठी असले उत्सव व्हायला हवेत, नाही असे नाही, मात्र केवळ उत्सवप्रियतेत अडकून मूलभूत प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आपल्या देशाला परवडणारे नाही याचेही भान आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करताना आपल्या सर्वांना येण्याची आवश्यकता आहे.