Advertisement

NEET परीक्षा राज्यातून लवकरच हद्दपार

प्रजापत्र | Monday, 14/08/2023
बातमी शेअर करा

चेन्नई - NEET परीक्षा पास होऊ न शकल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. त्याच्या पुढच्याच दिवशी मुलाच्या वडिलांनीही जीवन संपवल्याचं समोर आलंय. तामिळनाडूच्या चेन्नईमधील ही धक्कादायक घटना आहे. जगदीशस्वरन २०२२ मध्ये ४२७ गुण घेऊन बारावी पास झाला होता. त्यांनी दोनदा परीक्षा दिली पण तो NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास होऊ शकला नाही. शनिवारी, वडीलांनी फोन केल्यास त्याने उचलला नाही. तो राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या वडीलांना दु:ख सहन न झाल्याने त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी याबाबत माहिती दिली. 

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवावा आणि चांगलं आयुष्य जगावं. आत्महत्येचा विचार देखील मनात आणू नये, असं ते म्हणाले. तमिळनाडू सरकारने २०२१ मध्ये NEET परीक्षा टाळण्याचे विधेयक सभागृहात सादर केले होते. NEET परीक्षा उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना झुकते माप देणारी आहे. गरीब कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यासाठी खाजगी क्लासेस लावू शकत नाहीत. तसेच बारावी परीक्षेत जास्त गुण घेऊनही NEET परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असं तमिळनाडू सरकारचं म्हणणं होतं.

 

तामिळनाडू राज्य सरकारने NEET वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विधानसभेत घेतला होता. तसेच विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी यावर कोणताही निर्णय न घेतल्याने परत एकदा हे विधेयक मंजूर करुन राज्यपालांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर राज्यपाल आरएन रवी यांनी विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पाठवले आहे.

 

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलं की, येत्या काही दिवसात NEET परीक्षा राज्यातून हद्दपार होईल.NEET परीक्षा लाखो रुपये परवडणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्यांना बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले आहेत असे विद्यार्थी लाखो रुपये खर्च करुन क्लास लावतात आणि एक-दोन वर्षात परीक्षा पास होतात. NEET परीक्षा फक्त श्रीमंतांची मक्तेदारी झाली आहे.राज्याने NEET परीक्षेत ७.५ टक्के आरक्षण ठेवले आहे, त्यामुळे काही प्रमाणात सरकारी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना संधी मिळत आहे.

Advertisement

Advertisement