नवी दिल्ली - लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर सध्या दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून भाषणं चालू असून गुरुवारी १० ऑगस्ट रोजी त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींनी केलेल्या भाषणात मोदी सरकारवर परखड शब्दांत टीका करण्यात आली. “मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.
“मोदींसाठी मणिपूर हिंदुस्थान नाही”
“काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. तिथे महिलांशी बोललो. मुलांशी बोललो. जे आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. एका महिलेला मी विचारलं, तुमच्याबरोबर काय झालं? तर एक महिला म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते”, असं राहुल गांधी म्हणाले.