Advertisement

मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रजापत्र | Monday, 07/08/2023
बातमी शेअर करा

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याने तणावाचे वातावरण आहे. या हिंसाचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने मोठं पाऊल उचललं आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली आहे.

 

या समितीमध्ये हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती गीता मित्तल, शालिनी जोशी, आशा मेनन यांचा समावेश करण्यात आला असून गीता मित्तल या समितीच्या अध्यक्ष असणार आहेत. तसेच 'सीबीआय'च्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी देखील एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली. पण यानंतर मणिपूर हिंसाचाराच्या घटनेचा तपास 'सीबीआय'कडे सोपवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता.

मणिपूरमधील हिंसाचाराचे गांभीर्य ओळखून आणि घटनेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर सरकारनेही तातडीने पावलं उचलत कारवाई केली. पण आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मोठा निर्णय घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली. याबरोबरच 'सीबीआय'च्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठीही एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement