Advertisement

नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत

प्रजापत्र | Monday, 07/08/2023
बातमी शेअर करा

 

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्ध्याहून अधिक आमदार अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर शरद पवार गटासोबत अजुनही काही आमदार कायम आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौऱा पार पडला. या दौऱ्यात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, आपला नेता आणि पक्ष अडचणीत असताना पळून जाणारा नेता जयंत पाटील नाहीत. आम्ही लढणारे नेते आहोत, असंही राऊत म्हणाले.

 

राऊत पुढं म्हणाले की, या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने दिली होती. तेच भाजप आता अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकरशहाच्या हाती देत आहेत.

 

राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही दिल्ली सेवा विधेयकाला विरोध करणार आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांना जास्त सिरीयस घेऊ नका. सध्या एकमेकांवर फुलं उधळण्याचे काम सुरू आहेत. पण त्यांच्यात अंतर्गत काय सुरू आहे हे आम्हाला माहित, असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.

Advertisement

Advertisement