वॉशिंग्टन - टूरिस्ट व्हिसावर अमेरिकेत फिरण्यासाठी गेलेल्या भारतीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडताना तरुणाचा अपघात झाला. त्याच्या अंगावरुन एकापाठोपाठ एक १४ वाहनं गेली. त्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली. दर्शील ठक्कर असं तरुणाचं नाव असून तो गुजरातच्या पाटणचा रहिवासी होता. टूरिस्ट व्हिसावर तो अमेरिकेला गेला होता. दर्शीलच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
गुजरातच्या पाटणमध्ये राहणारा दर्शील ठक्कर ४ महिन्यांपूर्वी टूरिस्ट व्हिसावर अमेरिकेत गेला. २९ जुलैला सकाळी साडे अकरा वाजता रस्ता ओलांडताना त्याला भरधाव कारनं धडक दिली. यानंतर त्याच्या अंगावरुन चौदा कार गेल्या. दर्शीलचा जागीच मृत्यू झाला. अनेक वाहनांखाली चिरडला गेल्यानं त्याच्या मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या.
दर्शीलचा अपघात झाला त्यावेळी एक मित्र त्याच्या सोबत होता. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, सिग्नल बंद असताना दर्शील रस्ता ओलांडत होता. मात्र नेमका त्याचवेळी सिग्नल सुरू झाला. वाहनं वेगात निघाली. दर्शीलला कारनं धडक दिली. त्यामुळे तो खाली कोसळला. यानंतर एका पाठोपाठ एक गाड्या त्याच्या अंगावरुन गेल्या. दर्शील वाहनांखाली चिरडत गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दर्शीलच्या मृत्यूची माहिती त्याच्या मित्रानंच पाटणमधील त्याच्या कुटुंबाला दिली.
दर्शीलच्या निधनाची बातमी समजताच कुटुंब शोकसागरात बुडालं. त्याच्या कुटुंबियांनी पार्थिव भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो भारतात आणणं शक्य नाही. त्यामुळे दर्शीलच्या कुटुंबातील जण अमेरिकेला गेले आहेत. तिथेच त्याच्यावर अंत्यविधी होतील. दर्शीलच्या मृत्यूनं कुटुंब आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. हातातोंडाशी आलेला लेक गेल्यानं आई, वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.