नवी दिल्ली-प्रत्येक राज्यसभा खासदाराने एकदा तरी निवडणूक लढवावी, भाजपा हा एक प्रभावी आणि युतीसाठी अनुकूल पक्ष असल्याचे खासदारांनी ठामपणे लक्षात आणून द्यावे, तसेच खासदारांनी फक्त राम मंदिर या एकाच मुद्द्यावर विसंबून न राहता त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रत्यक्षात काम केले पाहिजे”, असे आणि इतर अनेक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या बैठकीत मांडले आहेत. सोमवार (३१ जुलै) पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए युतीमधील खासदारांच्या बैठका घेत आहेत. खासदारांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या बैठकांची सुरुवात करताना आपण तिसऱ्यांदा हमखास सत्तेत येणार, याचीही शाश्वती ते देत आहेत.
दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाकडे फारसे खासदार नाहीत. याठिकाणी भाजपा हा युतीमधील प्रभावी आणि अनुकूल भागीदार असल्याचे मोदी सांगत आहेत. त्यांनी खासदारांना संदेश देताना सांगितले की, भाजपा आपल्या मित्रपक्षांसोबत राज्यात सत्ता नसतानाही ठामपणे उभा राहतो. (तमिळनाडूमध्ये सत्ता नसतानाही भाजपाने अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाला पाठिंबा दिलेला आहे.) एनडीएची स्थापना होऊन आता २५ वर्ष होत आहेत. एनडीएची स्थापना कोणत्याही एका व्यक्तीचा विरोध करण्यासाठी झालेली नाही, तर ती विशिष्ट उद्देश नजरेसमोर ठेवून झालेली आहे. तर विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी केवळ मोदींना रोखण्यासाठी झालेली आहे, असेही पंतप्रधान मोदी बैठकीत बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली.