खाजगी डॉक्टराने एका 59 वर्षीय रुग्णाच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी चक्क त्यांचा डावा पाय कापण्यात आला आणि यामुळे संबंधित रुग्ण दोन्ही पायाने अधु झाला हा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करताना आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून खूप त्रास दिला गेल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. नक्की काय घडलं जाणून घ्या.
खाजगी डॉक्टरकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ
नाशिकच्या जेलरोडवरील दसक भागात राहणारे सुभाष खेलूकर, वय 59 वर्ष. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ते सिनियर फिटर या पदावर काम करतात. 2014 साली त्यांचा दुचाकीवर एक अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आला होता. मात्र तो रॉड चालताना दुखत असल्याने तो रॉड काढून टाकण्यासाठी 20 मे 2023 ला नाशिकरोड परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले.
उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डावा पाय कापला
हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विपुल काळे यांनी उजव्या पायाचा एक्स रे काढण्यास सांगितले. तसेच ब्लड, युरीन टेस्ट, इ.सी.जी., सोनोग्राफी अशा सर्व टेस्ट करायला सांगितल्या. त्या सर्व टेस्ट करून रिपोर्ट डॉक्टरांकडे सादर करताच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 26 मे रोजी खेलूकर ऍडमिट झाले आणि 27 तारखेला दुपारी दीडच्या सुमारास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेण्यात आले. तिथे जाताच एका सिस्टरने त्यांच्या उजव्या पायावर लाल रंगाच्या पेनाने बाणासारखी निशाणीही केली त्यानंतर भूलतज्ज्ञ आले आणि त्यांनी सहा ते सात हॉस्पिटल स्टाफच्या उपस्थितीत त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले. जवळपास अडीच तासानंतर ऑपरेशन थिएटरमधून सुभाष खेलूकर यांना बाहेर आणण्यात आले. मात्र, पुढे काय समोर आले ते तुम्हीच ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
नेमकं घडलं काय?
सुभाष खेलूकर यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितलं की, "मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. डॉक्टर विपुल काळे यांनी पत्नी आणि मुलाला सांगितलं की, तुमच्या पेशंटचे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे, परंतु त्यांच्या डाव्या गुडघ्यावर ब्लेड पडल्यामुळे दोन टाके पडले आहेत, त्याला बँण्डेज लावले आहे, ते पाहून तुम्ही घाबराल म्हणून तुम्हाला आगोदरच सांगत आहे.' असे सांगितले. हा काहीतरी विचित्र प्रकार वाटताच बँडेड खोला, असं मुलाने सांगताच डाव्या पायावर पाच टाके पडल्याचे निदर्शनास आले आणि हे बघताच माझे घरचे घाबरले. माझी भूल उतरल्यानंतर मला जाणवायला लागले होते की, माझे दोन्ही पाय काम करत नाहीत म्हणून मला आता बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, वॉकर घेऊन चालावे लागते. डॉक्टरांचा हा सर्व निष्काळजीपणा आहे. आमच्या डोळ्यात त्यांनी धूळफेक केली."