Advertisement

वाह रे न्याय ! कंत्राट सरकारने द्यायचे, वसुलीचे आरोप पुढाऱ्यांवर आणि कारवाई मात्र अधिकाऱ्यावर

प्रजापत्र | Thursday, 03/08/2023
बातमी शेअर करा

डॉ. साबळेंच्या निलंबनाच्या घोषणेने जिल्ह्यात संताप

 

बीड दि. ३ (प्रतिनिधी) : राज्य सरकारने कंत्राट दिलेल्या कंपनीने बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगावच्या रुग्णालयातील भरतीची सूत्रे पुढाऱ्यांकडे दिली, त्यासाठी मोठ्याप्रमाणावर माया जमविल्याची चर्चाही झाली आणि या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी कारवाई मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांवर केली. लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील भरती गैरव्यवहार प्रकरणात बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा विधानपरिषदेत करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या घोषणेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात बाह्यस्त्रोतांमार्फत भरती करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने नाशिक येथील कंपनीला कंत्राट दिले आहे. आता जिल्ह्यात या  कंपनीने काही पुढाऱ्यांच्या हाती भरतीची सूत्रे दिली आणि त्यांनी प्रत्येक पदासाठी मोठ्याप्रमाणावर बोली लावल्याची चर्चा आहे. तशा तक्रारी देखील झाल्या. याच संदर्भात विधानपरिषदेत प्रश्न विचारला गेला आणि याला उत्तर देताना सरकारने बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बीड जिल्ह्यात मात्र संताप व्यक्त होत आहे.
मुळात बाह्यस्त्रोतांमार्फत पद भरती करण्याचा निर्णय सरकारचा. कंपनी नियुक्त करणारे देखील सरकारच . पदे  त्या कंपनीने भरायची आणि कंपनी ज्याला पाठविलं त्यांना अधिकाऱ्यांनी रुजू करून घ्यायचे असा हा नियम. आता कंपनीचे लोक भरती करताना कोणाकडून काय घेतात याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना असण्याचे कारण नाही, किंवा कंपनीच्या नावावर कोणी वसुली केली तर त्याची जबाबदारी कंपनीने घ्यायला हवी. मात्र कंपनीवर आणि कंपनीच्या नावावर माया गोळा करणारांवर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही, त्यामुळे या साऱ्या प्रकरणात कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सकांचा बळी दिला जात असल्याची भावना जिल्ह्यात आहे. सरकारच्या या अजब घोषणेबद्दल जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. करायचे कोणी आणि भरायचे कोणी असला उरफाटा न्याय सरकार का लावीत आहे ? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. 

Advertisement

Advertisement