मुंबई - मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात आज मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन पार पडलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीवर नार्वेकर यांनी अजित पवार यांना बसण्यास सांगितलं. त्याआधी स्वतः नार्वेकरांनीच खुर्चीवरील मुख्यमंत्री असं लिहिलेलं स्टीकरही काढलं.नार्वेकरांच्या या कृतीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली असून, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे दावे अजित पवार यांचे समर्थक आणि राज्यातील विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता नार्वेकरांच्या कृतीमुळे पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे. घडलेल्या प्रकरानंतर माध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर म्हणाले, आजच्या मंगलमय दिनी निरर्थक चर्चेला सुरुवात करु नका. मुख्यमंत्री व्यक्तीगत अडचणीमुळे येऊ शकले नाहीत.
काय झाले नेमकं व्यासपीठावर?
भूमीपूजन कार्यक्रमानंतर व्यासपीठावर चंद्रकांत पाटील, नीलम गोऱ्हे, रविंद्र चव्हाण, राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस त्यांच्या आसनांवर बसले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर आले. त्यांची खुर्ची चंद्रकांत पाटील आणि गोऱ्हे यांच्यामध्ये ठेवण्यात आली होती. अजित पवार त्या खुर्चीवर बसले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंची खुर्ची रिकामीच होती. मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाला येणार नसल्यानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना शिंदेंच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. मात्र खुर्चीवर मुख्यमंत्री असे स्टिकर होते. नार्वेकरांनी त्यांच्या शेजारील खुर्चीवर लावलेलं स्टिकर काढलं.नार्वेकरांनी स्टिकर काढल्यानंतर पवार या खुर्चीत बसले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
महाराष्ट्रातील आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था असणारे मनोरा आमदार निवासाच्या दोन उंच इमारती असणार आहे. एक इमारत 40 आणि दुसरी इमारत 28 मजल्यांची असणार आहे. सुमारे 1200 कोटी खर्चून विधानसभेच्या 288 तर विधान परिषदेच्या 78 अशा एकूण 368 आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.