मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केली आहेत. हा मुद्दा आज चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभेत गाजला. विरोधकांनी भिडेंना अटक करावी ही मागणी लावून धरल्यानं सभागृहात मोठं घमासान पहायला मिळालं.
यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं अखेर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत काय घडलं?
विधानसभेच कामकाज सुरु झाल्यानंतर सर्व वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांनी भिडे विकृत माणूस असल्याचं म्हटलं. त्यानंतर नाना पटोले यांनी सूचना दिली. यावर चर्चेची मागणी केली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर शुक्रवारी चर्चा झाल्यानं तो पुन्हा चर्चेला घेता येणार नाही असं सांगितलं. त्यानतंरही काँग्रेस नेत्यांकडून गोंधळ सुरुच राहिला.
यशोमती ठाकूरांनी मांडला धमकीचा मुद्दा
यशोमती ठाकूर यांनी म्हटलं की, मला धमकी दिली आहे, त्यामुळं हा प्रश्न गंभीर आहे. यावर फडणवीस म्हणाले, अमरावतीत त्यांच्यावर २९ जुलै रोजी गुन्हा देखील दाखल झाला आहे.
फडणवीस म्हणाले, माध्यमांमध्ये जे विविध व्हिडिओ फिरत आहेत त्यांचे व्हॉईस सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करण्यात येईल. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी जी तक्रार केली आहे ती अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करण्याचा अधिकार नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
भिडे फ्रॉड माणूस - चव्हाण
यानंतर पृथ्वीराज चव्हाण देखील बोलू लागले माझ्यासह अनेक सदस्यांना धमकी आली आहे, याप्रकरणी कारवाई करावी, यामागचा सुत्राधार कोण आहे? हे शोधून काढावं, असंही ते म्हणाले. तसेच भिडे हा फ्रॉड माणूस आहे तो लोकांकडून सोनं गोळा करत आहे. कोणत्या संस्थेअंतर्गत तो सोनं गोळा करतो? तरुणांची दिशाभूल करुन बहुजन मुलांची तो फरफट करतो, असा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.