Advertisement

“मला दारूचं व्यसन नसतं तर…”

प्रजापत्र | Sunday, 30/07/2023
बातमी शेअर करा

सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयातून संपूर्ण जगभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी यश मिळवलं. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की चाहते त्यांना देवाचा दर्जा देतात. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात. त्यांच्या कामबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते नेहमी चर्चेत असतात.

 

 

नुकतंच रजनीकांत यांनी त्यांच्या एका वाईट व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. आगामी ‘जेलर’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉंचदरम्यान रजनीकांत यांनी मीडिया आणि चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. याचदरम्यान त्यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला. दारू पिणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचंही त्यांनी कबूल केलं.

रजनीकांत म्हणाले, “जर दारूचं व्यसन मला जडलं नसतं तर मी समाजासाठी अधिक चांगलं काम करू शकलो असतो. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. माझ्या भावाने मला तेव्हा बजावलं होतं. दारू माझ्या आयुष्यात नसती तर मी आणखी चांगला माणूस आणि स्टार बनू शकलो असतो. मद्यपान पूर्णपणे सोडा असं माझं म्हणणं नाही, पण रोज मद्यपान करू नका. यामुळे तुमचा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य खराब होऊ शकतं. याची सर्वात जास्त झळ तुमच्या पालकांना, कुटुंबाला आणि तुमच्या भोवतालच्या लोकांना बसते.”

 

पुढे रजनीकांत म्हणाले, “अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी कंडक्टर तेव्हा मी रोज दारू प्यायचो, सिगारेट ओढायचो तसेच नियमित मांसाहारदेखील करायचो आणि हे जे करत नाहीत त्यांची कीव करायचो. पण आता मला वाटतं की या तीनही गोष्टींच्या आहारी जे जातात ते वयाच्या साठीनंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत.” रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. येत्या १० ऑगस्टला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याबरोबरच आपल्या मुलीने दिग्दर्शित केलेला रजनीकांत यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘लाल सलाम’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
 

Advertisement

Advertisement