नवी दिल्ली - मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी व्हिडीओ बनविणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
या खटल्याची सुनावणी मणिपूरबाहेर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. १८ जुलैपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गृह मंत्रालय मैतेई आणि कुकी संघटनांच्या संपर्कात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्याने चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही सर्व माहिती दिली आहे.
मणिपूर महिला अत्याचाराची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या गुरुवारी मणिपूरमध्ये महिलांच्या छेडछाडीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली होती. केंद्र आणि मणिपूर सरकारने कारवाई करावी, अन्यथा आम्ही करू, सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते.