बीड - शहरातील सुभाष रोड परिसरात मधोमध कार पार्किंग करणाऱ्या चालकाविरोधात, येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित वाहनावर नो पार्किंगचा पाचशे रुपयांचा दंड ऑनलाइन दिला होता. प्रारंभ याचाच राग मनात धरून संबंधीत चालकाने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सावधगिरीमुळे ते यातून बचावले परंतु त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड जिल्हा वाहतुक शाखेतील कर्मचारी विष्णु उध्दवराव काकडे (वय-४०) हे सुभाष रोड याठिकाणी वाहतुक कोंडी होऊ न यासाठी ड्युटीवर होते. याच दरम्यान अक्षय तुकाराम खोपे रा गुंजथडी ता माजलगाव जि बीड. यांनी त्यांची कार (एमएच ४४ सीसी ७७६८) रस्त्याच्या मधोमध लावली होती. यामुळे पोलीस कर्मचारी काकडे यांनी नो पार्किंगचा ५०० रुपये दंड दिला. याचाच राग मनात धरुन खोपे यांनी काकडे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात काकडे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. काकडे यांच्या फिर्यादीवरुन अक्षय खोपे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.