Advertisement

वर्ल्ड कप स्पर्धेतील इंडिया वर्सेस पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार?

प्रजापत्र | Wednesday, 26/07/2023
बातमी शेअर करा

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज इंडिया-पाकिस्तान सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी हॉटेल्स आतापासून फुल झाले आहेत... चाहत्यांना हॉटेल्स उपलब्ध नसल्याने त्यांनी आयडिया लढवताना त्या दिवसाचे हॉस्पिटलमध्ये पलंग बूक केल्याच्याही बातम्या समोर येत आहेत... पण, चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरवणारी बातमी समोर येतेय... India vs Pakistan सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे, परंतु आता त्याची तारीख बदलणार असल्याची माहिती मिळतेय आणि कदाचित सामना अहमदाबाद इथूनही हलवला जाऊ शकतो. तसंही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) अहमदाबाद येथे खेळायचेच नव्हते आणि त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे.

भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) त्या तारखेमुळे चिंता वाटू लागली आहे. कारण, १५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि गुजरातसह देशभरात गरबा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव ICC ने या सामन्याची एकतर तारीख बदला किंवा सामना दुसरीकडे खेळवा असा सल्ला BCCI ला दिला आहे.  

''आम्ही पर्यायांवर विचार करत आहोत आणि लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. नवरात्रीच्या दिवशीच होणाऱ्या या सामन्यासाठी लाखो चाहते अहमदाबाद येथे दाखल होणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडू शकतो, असे आम्हाला सुरक्षा यंत्रणेने सांगितले आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. त्यामुळे ही लढत एकतर १४ ऑक्टोबरला होऊ शकते किंवा चेन्नईत हलवली जाऊ शकते. PCB लाही अहमदाबाद येथे ही मॅच व्हायला नको होती. 

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. भारतासह बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांच्यासह श्रीलंका आणि नेदरलँड्सही आता भारतात येणार आहे. भारताचा आयसीसी स्पर्धा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI नेही कंबर कसली आहे. मागील महिन्यात आयसीसीने वर्ल्ड कपचे वेळापत्रकही जाहीर केले. 

Advertisement

Advertisement