लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधीपक्षाचे अस्तित्व देखील मान्य करावे लागते. विरोधीपक्षांना सत्ता द्यायची का नाही, किंवा त्यांना निवडणुकीच्या राजकारणात किती स्थान द्यायचे याचा निर्णय जनता करत असतेच. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी विरोधीपक्षांचा उपमर्द करण्यासाठी त्यांची तुलना देशाच्या शत्रूंशी म्हणा किंवा शोषकांशी करणे केवळ अशोभनीयच नाही तर अश्लाघ्य सुद्धा आहे. निवडणूक जिंकण्यासाठी किती खालची पातळी गाठायची याचा विचार किमान पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने तरी करावी असे अपेक्षित आहे, मात्र त्यांनीच बोलघेवडेपणातून मर्यादा सोडल्यावर बोलायचे कोणाला ?
या देशात स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काँग्रेस सत्तेत होती. आजच्या मोदी सरकारला जेवढे बहुमत आहे, त्यापेक्षाही अधिक बहुमताची सरकारे देशाने पहिली आहेत. केवळ काँग्रेसचेच कशाला, आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये जनता सरकारला देखील मोठे बहुमत मिळाले होतेच. त्यावेळी काँग्रेसला विरोधीपक्षात बसावे लागले होते. आज जो भाजप सत्तेत आहे, त्याच भाजपला अनेक वर्ष विरोधीबाकावर काढावे लागलेच. लोकशाही व्यवस्था म्हटल्यावर सत्ताधारी जसे असतात, तसेच विरोधक देखील असणारच. विरोधीपक्षच नको असे म्हटले तर तो प्रकार लोकशाहीचा राहणारच नाही, ती हुकूमशाहीचा असेल. याचे भान देशातील आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी ठेवले होते. विरोधी पक्षावर टीका करणे समजू शकते. निवडणुकीच्या काळात विरोधीपक्षाच्या अकार्यक्षमतेवर केलेले प्रहार देखील समजू शकतात. यापूर्वी असे अनेक 'सुसंवाद ' देशाने अनुभवलेले आहेत. सत्तेतल्यांनी विरोधीपक्षाच्या शक्तीची खिल्ली देखील उडवलेली आहे. मात्र हे सारे करताना विरोधी पक्ष हे देखील याच देशातील जनतेच्या भावनेचे प्रतिबिंब आहेत याचे भान आजपर्यंतच्या सत्ताधार्यांनी ठेवलेले होते. विरोधीपक्षांना थेट देशाच्या शत्रूंच्या , अतिरेक्यांच्या किंवा शोषकांच्या रांगेत नेऊन बसविण्याचे किंवा विरोधी पक्षांची तुलना त्यांच्याशी करण्याचे काम आजपर्यंत कोणी केले नव्हते. किमान देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने तर नाहीच नाही . मात्र आता पंतप्रधानपदावरील व्यक्ती देखील काय बोलेल याचा भरवसा राहिलेला नाही.
भाजपला कायम आपणच कसे राष्ट्रभक्त आहोत असे दाखविण्याचा सोस राहिलेला आहे. असे करण्यात काही गैर आहे असे देखील नाही. पण भाजपच्या स्वतःच्या राष्ट्रभक्तीचे सारे नेरेटिव्ह हे इतरांना राष्ट्रद्रोही ठरविण्यात असते. या देशात केवळ भाजप आणि त्यांचे साथीदारच देशप्रेमी आहेत आणि त्यांना विरोध म्हणजे देशाला विरोध असे सांगण्याचा प्रयत्न भाजपचा सातत्याने असतो. आता पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या 'इंडिया 'आघाडीच्या संदर्भाने जे अशोभनीय वक्तव्य केले आहे, ते भाजपच्या याच विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरविण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. हे लोक इतके सरावले आहेत की मतांच्या राजकारणासाठी ज्यांनी देशाचे माजी पंतप्रधान आणि अगदी उप्राष्ट्र्पतींभोवती देखील संशयाचे डहाके निर्माण केले, ते आज विरोधीपक्षांच्या आघाडीची तुलना इस्ट इंडिया कंपनीशी किंवा इंडियन मुजाहिदीनशी करीत असतील तर त्यात नवीन काही नाही. असला अश्लाघ्य आचरटपणा हाच भाजपचा आणि पंतप्रधानांचा देखील खरा चेहरा आहे. आज मोदी आपण सक्षम असल्याचा कितीही आव आणीत असले तरी विरोधीपक्षांच्या आघाडीने त्यांना अस्वस्थ केले आहे हेच वास्तव आहे. आणि याच अस्वस्थतेतून मोदी आता विरोधीपक्षांची संभावना करताना आपण काय बोलत आहोत आणि त्याचा अर्थ काय होतो याचे देखील भान विसरले आहेत .