Advertisement

गुरमित राम रहिमची तुरुंगातून सुटका

प्रजापत्र | Thursday, 20/07/2023
बातमी शेअर करा

रोहतक - बलात्कार आणि हत्येच्या आरोपांखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम याला आज पुन्हा एकदा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

त्यामुळं रोहतक येथील मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात तो ४० दिवसांसाठी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. 

यापूर्वीही गुरमीत राम रहिम याची तीन वेळा पॅरोलवर सुटका झाली होती. गेल्यावर्षी हरयाणतील पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला पॅरोल मंजूर झाला होता.

यावेळी त्यानं पॅरोलच्या काळात आपल्या आश्रमात सत्संगाचं आयोजन केलं होतं. यामध्ये हरयाणातले भाजपचे मोठे नेते सहभागी झाले होते. त्यामुळं मोठी टिकाही झाली होती.

 

बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी
आपल्या दोन महिला शिष्यांवर बलात्काराच्या आरोपांखील त्याला २० वर्षांची शिक्षा तसेच हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टानं ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. माजी डेरा व्यवस्थापक रंजीत सिंह याच्या हत्या प्रकरणात कोर्टानं राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

 

पॅरोल काय असतो?
शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी आरोपीला तुरुंगातून काही काळासाठी घरी जाण्याची मुभा दिली जाते त्याला पॅरोल असं म्हणतात. तुरुंगात चांगली वागणूक हे पॅरोल मंजूर होण्यामागील प्रमुख अट असते. तसेच पॅरोलच्या सुट्टीसाठी आरोपीला योग्य कारण सांगावं लागतं. यानंतर संबंधित राज्य सरकार त्याच्या पॅरोलवर अंतिम निर्णय सुनावते.

 

Advertisement

Advertisement