ज्यावेळी भारतीय राजकारणातील कॉंग्रेस आणि इतर पक्षांना भ्रष्टाचाराची, काहींना बेदिलीची, कुठे फाटाफुटीची किटाळं चिटकत होती, त्यावेळी भाजप मात्र 'पार्टी विथ डिफरन्स' चा अभिमान मिरवत असायचा. आम्ही कसे संस्कारित आहोत आणि इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे सांगताना तमाम भाजपेयींची आणि भाजपची मातृ संघटना असलेल्या संघ स्वयंसेवकांची छाती अभिमानाने फुलून यायची. अर्थात हा काळ तेव्हाचा आहे, ज्यावेळी भाजपला सत्तेचा स्पर्श फारसा झालेला नव्हता. राजकारणात एक त्रिकालाबाधित सत्य सांगितले जाते. 'पाॅवर करप्ट्सॲंड ॲब्सुलूट पाॅवर करप्ट्स ॲब्सुलूटली'. अर्थात सत्ता व्यक्तीला भ्रष्ट बनविते आणि निरंकुश सत्ता तर निरंकुशपणे भ्रष्ट बनविते, हे भ्रष्ट बनणे केवळ आर्थिक व्यवहारापुरते नसते, तर एकंदरीतच वर्तनाचे असते. आज भाजपने आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पावन करण्याचा जो कार्यक्रम सुरु केला आहे, तो कलंकितांचा पुन:रोदय हा भाजपचा नागवा चेहरा आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या रालोआच्या बैठकीतले हे चित्र. भाजप नेते विनोद तावडे यांनी 'गाडीभर' पुराव्यांच्या आधारे ज्या अजित पवारांना बेड्या ठोकणार असं जाहीर केलं होतं. त्यांनी अजित पवारांच एनडीए बैठकीत शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं, त्यांना रालोआच्या दरबारात मानाचं स्थान दिलं. अजित पवारांना भाजपच्या कृपेने राज्यात उपमुख्यमंत्रीपदाचे मानाचे पान तर अगोदरच मिळालेले आहेच. आता रालोआत ते मानाच्या स्थानी बसले आणि विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे निघून गेल्यानंतर मोदी, शहा, नड्डा यांच्याशी अजित पवारांची खलबते देखील झाली.
आता असे ज्यांच्यावर आरोप झाले, त्या कथित कलंकितांना पावन करुन घेतलेल्या पंक्तीतील अजित पवार हे काही एकटे नाहीत किंवा पहिले वहिले तर नक्कीच नाहीत. भाजपच्या चाणक्याने सांगितलेल्या 'साम, दाम, दंड, भेद' या नितीद्वारे भाजपने आपल्या आश्रयाला घेऊन 'पावन' केलेल्यांची यादी फार मोठी आहे, आणि विशेष म्हणजे सावरकरांच्या शब्दात जे हिंदुस्थानचे वर्णन आले आहे ते 'आसिन्धु सिन्धु पर्यन्ता' म्हणजे हिंदी महासागर ते हिमालय पर्वत अशा सर्व भूभागाला व्यापणारी ही यादी आहे.
अगदी सुरुवातीच्या काळात सत्तेमुळे येणारे दोष जेंव्हा कॉंग्रेस आणि इतर पक्षांमध्ये दिसून येत होते, त्यावेळी भाजप स्वत:ला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवण्यात धन्यता मानित होता. त्यावेळी ते बव्हंशी खरेही होते. भाजपवाले इतरांवर भ्रष्टाचाराचे, अनैतिक व्यवहारांचे आरोप करायचे. पण आजचे चित्र काय? सत्ता व्यक्तीला भ्रष्ट बनविते आणि निरंकुश सत्ता तर निरंकुशपणे भ्रष्ट बनविते.या त्रिकालाबाधित सत्याला भाजप देखील अपवाद राहिलेला नाही. उत्तरेतील सुखराम, विद्याचरण शुक्ला असतील किंवा दक्षिणेतील आणखी कोणी, पश्चिम बंगालमधील तृणमूल मधून आयात केलेले नेते असतील किंवा कर्नाटक, गोवा आदी राज्यात ज्यांच्यावर अगोदर आरोप केले आणि आता ज्यांना भाजपा किंवा रालोआच्या दरबारात मानाचे स्थान दिले, अशी नावे अनेक आहेत. महाराष्ट्रात तर अजित पवारांवर टिका करता करता भाजपवाल्यांचे जबडे झिजले, 'चक्की पिसींग पिसींग' काय किंवा 'नाही, नाही, नाही, कदापी नाही. आपदधर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कोणताच धर्म नाही, राष्ट्रवादीशी युती नाही' थाटाच्या घोषणांनी भाजपेयींना काय तो उत्साह यायचा. पण आता त्या घोषणांचे काय करायचे? प्रश्न एकटया अजित पवारांचा नाहीच, भाजपनेच भ्रष्ट ठरविलेल्या अनेकांचे आज जे लाड भाजप करीत आहे, हे सारे भाजपचा सत्तापिपासू चेहरा सांगणारे आहे. राहिला प्रश्न नैतिकतेचा, तर कुरूलकर ते सोमय्या असा खरा चेहराच उघडा पडत आहे. वास्तविक सगळ्या पक्षातले सगळे खरे आणि तथाकथित भ्रष्ट भाजपात दाखल करून घेतलेले असतांना मोदी इतरांना भ्रष्ट म्हणू शकतात यातच मोदींची खोटं बोलण्याची अमर्याद ताकद लक्षात येते! सगळेच भ्रष्ट भाजपात सामील झालेले असतांना इतरांना भ्रष्ट म्हणण्यासाठी छप्पन इंची छातीच लागते.