अमरावती - मंत्रिपदावरुन अस्वस्थ असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सकाळी ११ वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही, हे स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, आता त्यांचा निर्णय झाला असून आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
कडू म्हणाले, खरंतर गेले पाच वर्षे तुम्ही मला या सरकारमध्ये पाहत आहात. यासाठी मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं.
शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन
त्यानंतर जे काही नवीन समीकरणं जुळायला लागले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालय स्थापण्याबाबत मागणी केली होती. पण ते काही झालं नाही जर ते झालं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची गरज पडली नसती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. देशात पहिल्यांदाच असं मंत्रालय तयार झालं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
१८ जुलैला अंतिम निर्णय जाहीर करणार
सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप आणि चारित्र्य हनन करत आहेत. यापुढं आम्ही दिव्यांगांसाठी शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. त्यामुळं मंत्रीपदाचा दावा आम्ही सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे.