मुळात एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या शिवसेनेचे इतर आमदार काय, ते फार संसदीय वागण्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून फार संसदीय संकेतात वागण्याची अपेक्षा कोणी करणार देखील नाही. आडामधडाम वागणे हीच त्यांची परंपरा. मग संजय सिरसाट काय, संतोष बांगर काय किंवा संजय राठोड काय, एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी परिस्थिती. पण हे महाभाग संसदीय पदावर बसल्यावर किमान स्त्रियांप्रती चांगली भावना तरी ठेवतील अशी अपेक्षा करण्यात चूक ती काय ? पण येथेही त्यांचा पुरुषी अहंकार उफाळून येत असल्याचेच दिसत आहे. आ.भरत गोगावले यांनी आदिती तटकरेंबद्दल जे विधान केले ते कोणालाच पचणारे नाही, असले वाचाळ लोकच आता शिंदे-फडणवीस- पवार या तीन इंजिनच्या सरकारची अडचण ठरणार आहेत.
ज्यांनी अजून मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाही, त्यांना ती घ्यायला मिळेल का नाही हे देखिल सांगणे अवघड आहे, अशांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्र्यांचा उपमर्द करावा हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीने जिजाऊंचा पराक्रम पाहिला , ज्या महाराष्ट्राच्या मातीत सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांनी अतुलनीय योगदान दिले, त्या महाराष्ट्रात एक आमदार उठतात आणि ' महिलांपेक्षा पुरुषांचे काही तरी वेगळेपण असेल न, मी आदिती तटकरेंपेक्षा नक्कीच चांगले काम करेल ' असे म्हणत असतील तर त्यांना महाराष्ट्र कळला आहे असे म्हणायचे का ?
मुळातच भरत गोगावले काय किंवा शिंदे सेनेचे इतर आमदार काय ? इथे सारा वाचाळांचा भरणा झालेला आहे. विशेष म्हणजे यातील अनेकांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच दूषित आहे. मागे अब्दुल सत्तारांसारखे मंत्री खा. सुप्रिया सुळेंबद्दल काय बोलले होते हे महाराष्ट्र विसरेल असे नाही. आता भरत गोगावले काहीतरी बरळत आहेत. त्यामुळे या लोकांना स्वतःबद्दल अहंकार असतानाच महिलांबद्दल मात्र द्वेष असल्याचे दिसत आहे. ज्या आनंद दिघेंचे नाव घेत आज हे लोक वेगळे झाले, दिघेंचे विचार घेऊन आम्ही जात आहोत असे सांगत आहेत, त्या दिघेंना तरी महिलांचा अपमान सहन झाला असता का ? मात्र हे सारे होत असताना एकनाथ शिंदे मात्र गप्प आहेत .
एकनाथ शिंदेंचे एकवेळ ठीक आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची भूमिका देखील कधी फारशी महिलांचा सन्मान करण्याची राहिलेली नाही, पण अजित पवारांचे काय ? त्यांच्याच पक्षाच्या एका महिला लोकप्रतिनिधींबद्दल एक आमदार काहीतरी कमी लेखणारे विधान करतो आणि अजित पवारांना हे कसे पटते हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात महिला धोरण राबविण्यात मोठे योगदान राहिलेले आहे, त्या राष्ट्रवादीला गोगवलेंसारख्या वाचाळांच्या उठवळ प्रतिक्रियांचे काहीच वाटत नाही काय ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आज ना उद्या या साऱ्याच नेत्यांना राज्यातील जनतेला द्यावी लागतील .
मुळातच एकनाथ शिंदेंची शिवसेना काय , भाजप काय किंवा काही प्रमाणात ठाकरेंची शिवसेना आणि तर राजकीय पक्ष कायम, सारेच राजकारण निव्वळ उथळ झाले आहे. सगळीकडेच वाचाळांना मोठा भाव आला आहे आणि त्यांना महत्व मिळत आहे, त्यामुळेच राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. आणि हेच वाचाळ आज ना उद्या सरकारला आणि लोकशाही संकल्पनांना देखील अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत.