मुंबई - राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अशात हवामान खात्याकडून आता पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे घाट माथा आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती आहे. दरम्यान, खरंतर विकेंडमध्ये कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. यामुळे कोकण वगळता राज्यात इतरत्र पावसाचा जोर कमी असल्याचं पाहायला मिळेल.
सध्या मुंबई, ठाण्यासह अनेक शहरांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशात आज विदर्भात मुसळधार पाऊस बरसेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. १० ते १३ जुलै या काळात कोकण भागात मुसळधार पाऊस होईल तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही भागांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपर्यंत कोकणात चांगला, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस राहील.
हिमालयापासून पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ते गुजरातपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, हवेचा दाब अनुकूल नसल्याने राज्यात कोकण वगळता सर्वत्र रिमझिम पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे कोकणामध्ये १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हलका पाऊस होईल, असा देण्यात आला आहे.