बीड दि. ६ (प्रतिनिधी ) : राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्याप्रमाणावर फाटाफूट दिसत असून गल्ली ते दिल्ली हेच चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले असतानाच बीड मतदारसंघातील त्यांचे साथीदार मात्र अजित पवार यांच्या गोटात गेले आहेत. बबनराव गवते यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या गोटात प्रवेश केल्याने बीड मतदारसंघात हा आ. क्षीरसागर यांना धक्का मानला जात आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमधील राजकीय उलथापालथीमध्ये शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आ. संदीप क्षीरसागर यांना शरद पवार यांनी सुरुवातीपासून दिलेले ढळते माप आणि बीड विधानसभा मतदारसंघाची सामाजिक रचना पाहता आ. संदीप क्षीरसागर यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मात्र असे असले तरी मतदारसंघातील त्यांच्या अनेक साथीदारांनी मात्र या निर्णयात त्यांची साथ दिलेली नाही. ग्रामीण भागात आ. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्यासह बळीराम गवते आणि बीड पंचायत समितीच्या ६ माजी सदस्यांनी बुधवारीच मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या गोटात प्रवेश केला. यात मोहन देवकते,
उत्तरेश्वर सोनवणे, किशोर सुरवसे, किशोर वायसे ,कांता शिंदे, गुंडीबा नवले आदींचा समावेश आहे. यातील अनेकजण मागच्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. आता त्यांनी अजित पवार गटाचा पर्याय निवडला आहे . या साऱ्या प्रक्रियेत बबनराव गवते यांची भूमिका महत्वाची राहिली. यामुळे आता बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर जरी शरद पवारांसोबत असले तरी या मतदारसंघात देखील अजित पवार समर्थकांची शक्ती वाढली आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघाचे आमदार अगोदरच अजित पवार यांच्या गोटात गेलेले आहेत.