शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदासाठी वाट पाहत आहेत. तशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा होत्या. तशातच, आमदारांमधील अस्वस्थता वाढल्याने शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंगळवारी हमरीतुमरी झाल्याचेही वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले. आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत 'वर्षा' बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती काहींनी दिली. याच दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी, शिंदे गटातील मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.
"शिंदे गटाचे ८ ते १० आमदार मातोश्रीच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. आमच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत पण ती नावं सांगू शकत नाही. पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार यात आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळणार असं वाटत होतं, पण अद्याप मिळालेलं नाही त्यापैकी बहुतेक जण या यादीत आहेत. काहींना असेही वाटत आहे की त्यांची मंत्रिपदे जातील अशा आमदारांचा यात समावेश आहे. तर काहींनी मंत्रिपदाचे कपडेही शिवले होते, तेदेखील या यादीत आहेत," असा दावा विनायक राऊतांनी केला.
"सध्याच्या सरकारची परिस्थिती पाहता, ज्या लोकांनी मंत्रिपदाचे कपडे शिवले होते त्यांना आता समजून चुकले आहे की शिंदे गटातील अनेकांच्या पदरी निराशा येऊ शकते. नव्याने मंत्रिपद वाटले जाईल तेव्हा त्याचे तीन वाटे होतील आणि त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला केवळ दोन मंत्रिपदे येतील, त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार झाले, शिवीगाळ करण्यात आली आणि काही जण मुख्यमंत्र्यांवर धावून गेल्याचेही ऐकण्यात आले आहे", असे विनायक राऊत म्हणाले.