राजकारणात असलेला व्यक्ती हा तसा कसलेला कलाकार असतोच असतो, त्याचे अभिनय समाजाच्या खुल्या रंगमंचावर कायम सुरु असतात, मात्र तो कोलांटउड्या मारण्यात देखील कसा पटाईत असतो हे आजकाल जरा जास्तच पाहायला मिळत आहे. बुधवारी अजित पवारांच्या गटाची जी बैठक झाली, त्यातील जवळपास सर्वच नेत्यांची भाषणे, अगदी अजित पवारांसकट, ऐकली तर पुढारी किती लवकर किती कोलांटउड्या मारू शकतात हेच यातून समोर येत आहे.
जे अजित पवार अगदी कालपर्यंत पत्रकार परिषदांमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण आहेत हे माहित नाही का? शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत असे म्हणत होते, अगदी स्वतःच्या पक्षाच्या उदघाटनाच्यावेळी देखील ज्यांनी शरद पवारांचा फोटो लावला, त्याच अजित पवारांनी आता थेट शरद पवारांची मागच्या वर्षी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी झालेली निवड अवैध असून आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे, तसेच यावेळी अजित पवारांनी 'मी तुमच्यापोटी जन्माला आलो नाही, हाच आमचा गुन्हा आहे का?' असा सवाल केला. अजित पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर केलेला दावा असेल किंवा नात्यांच्या संदर्भाने केलेला सवाल, यातील वास्तव काय आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे, मात्र यातून अजित पवार किती टोकाच्या कोलांटउड्या मारू शकतात हेच समोर आले आहे.
छगन भुजबळ यांचे भाषण तर अधिकच कहर करणारे. एकीकडे शरद पवार यांना विठ्ठल म्हणायचे, त्यांना बडव्यांनी घेरले आहे असे म्हणायचे आणि त्याचवेळी शरद पवारांनी यापूर्वी फोडाफोडी केली नाही का? त्यावेळी इतरांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत का असा सवाल विचारायचा, हे सारे म्हणजे 'चित भी मेरी, पट भी मेरी' याच धाटणीचे.
आज अजित पवारांच्या गोटात झालेली सारीच भाषणे याच मार्गावरून जाणारी होती. धनंजय मुंडे काय किंवा इतर नेते काय, आता आम्हीच कसे बरोबर आहोत असे सांगण्यासाठी ज्या पद्धतीने धडपडत होते आणि भाषणबाजी करीत होते, ते सारे ओढून ताणून आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी आणि आपणच कसे अन्यायग्रस्त आहोत हे दाखविण्यासाठीच सुरु होते.
छगन भुजबळ यांच्याबाबतीत पक्षनिष्ठतेची अपेक्षा करणे फारसे अपेक्षित देखील नाही. ते मूळचे शिवसैनिक, त्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला, नंतर राष्ट्रवादीत आले, पक्षात असतानाच समता परिषदेच्या माध्यमातून पक्षात सवतासुभा उभा केला आणि आता ते अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. पण अजित पवारांनी असे काही बोलावे याला काय म्हणणार? ज्या अजित पवारांचे अपराध नव्हे तर अगदी डोंगराएवढे प्रमाद शरद पवारांनी माफ केले, अजित पवारांनी चुका करायच्या आणि शरद पवारांनी त्यांना सांभाळून घ्यायचे याची उदाहरणे कमी नाहीत. आज अजित पवारांनी, शरद पवार राजीनामा देतात आणि मागे घेतात, मग राजीनामा देतातच कशाला? असा सवाल केला आहे, पण याच अजित पवारांनी आतापर्यंत कितीवेळा राजीनामा देऊन मागे घेतला हे अजित पवार जरी विसरले असतील तरी लोक कसे विसरणार? अगदी शरद पवारांना 'इडी'ची नोटीस आल्यानंतर साऱ्या राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झालेली असताना देखील हेच अजित पवार राजीनामा देऊन गायब झाले होतेच. यापूर्वी देखील त्यांनी राजीनाम्याचा पोरखेळ केला होताच. मात्र त्या प्रत्येकवेळी त्यांचे 'पवार ' असणे त्यांच्या सर्व चुकांवर पांघरून पडण्यासाठी पुरेसे होते, आज मात्र त्यांना आपण शरद पवार यांच्या पोटी आलो नाही असे वाटत असेल तर असल्या कोलांटउड्यांना कृतघ्न पणापलीकडे काय म्हणणार? अजित पवार समर्थकांनी भलेही त्यांच्या भाषणावर टाळ्या वाजविल्या असतील, मात्र जनता हे सारे स्वीकारेल का? हा प्रश्न आहे.