गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तशाच प्रकारची घटना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंड केले होते. आता तेच नेते सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.
2 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 30-35 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत.
मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने जवळ केले आहे. यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.