मुंबई - राज्यातील राजकारणात रविवारपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार शिवसेना-भाजपसोबत गेले. त्यानंतर दोन-तीन दिवसांत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केले गेले. यावेळी अजित पवार यांनी ही वेळ आपल्यावर का आली? हा प्रश्न मांडत भाषणाला सुरुवात केली. यावेळी शरद पवार यांच्या बदललेल्या भूमिकेवर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.
परिस्थिती कशी बदलली
अजित पवार यांनी शरद पवार यांचे राजकारण कसे सुरु झाले, त्यानंतर देशपातळीवर परिस्थिती कशी बदलत गेली? हे सांगताना काळाप्रमाणे बदल केले पाहिजे, असे सांगितले. ते म्हणाले, देशात जनता पक्ष आज कुठे आहे? कारण ते बदलत गेले नाही. मी साहेबांमुळेच घडलो. माझे राजकारण त्यांच्याशिवाय नाही. परंतु देशपातळीवर आणि राज्य पातळीवर जे सुरु आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आपण विकासासाठी काम केले पाहिजे.
शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न
१९९९ ला निवडणूक घेतल्या. तेव्हा काँग्रेस एकत्र होती. परंतु सोनिया गांधी या परदेशी आहेत, हे आपणास शरद पवार यांनीच सांगितले. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगितले. आम्ही त्यावेळी ऐकले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचा जन्म झाला. मग २०१७ मध्ये आम्हाला सांगितले शिवसेना जातीवादी पक्ष आहे. मग २०१९ मध्ये शिवसेना जातीवादी राहिली नाही. त्यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केले. दोन वर्षांत कशी ही भूमिका बदलत गेली? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
त्या वेळी ५८ जागा मिळाल्या
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यावेळी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त ५८ जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना ७८ जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली. मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो.