राज्याच्या राजकारणात गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. या घडामोडींची सुरवात झाली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीने, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदार यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि राज्यातून सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेत 2 गट पडले.
त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते यांनी पुन्हा समर्थक आमदार यांना घेऊन शिवसेना भाजप यांच्या युतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. तर रविवारी अजित पवार यांनी आपल्या 8 आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली. तर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी युती करावी, असे पत्र शरद पवार यांना दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केला आहे.
परंतु राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले, पटेल यांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2022 च्या मध्यात भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
पटेल पुढे म्हणाले की, केवळ आमदारच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते हे सरकारचा एक भाग बनले पाहिजेत. अनेक आमदारांना मतदारसंघासाठी निधी वाटप, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदी समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली केली होती. त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी मांडलेल्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांना असे वाटते की, जर पक्ष शिवसेनेशी जुळवून घेत असेल तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही.
"शिवसेनेसोबत आमचे अनेक दशकांपासून वैचारिक मतभेद होते, पण तरीही आम्ही सरकार स्थापन केले. आम्ही मोठ्या राष्ट्रहितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली, ही विचारप्रक्रिया नवीन नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो," असंही ते पुढे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना पटेल म्हणाले कि, आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या आणखी आमदारांचा समावेश केला जाईल. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार खात्यांच्या वाटपाबाबत काम करत आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. "महाविकास आघाडी कमकुवत झाल्यामुळे, भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा विजय असेल, असंही ते म्हणालेत.
अजित पवार यांना ४३ हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीप्रमाणेच एकत्र कुटुंब राहिल्यास त्यांना आनंद होईल, असे पटेल म्हणाले. आम्ही आनंदाने निर्णय घेतला असे नाही. राजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात, असंही ते म्हणालेत. त्यांना पक्षातून काढून टाकण्याच्या शरद पवारांच्या निर्णयावर पटेल म्हणाले की, पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घटनेचे पालन केले नाही हे दुर्दैव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांवर पटेल म्हणाले की, मी पवारांवर भाष्य करणार नाही. ते माझे मार्गदर्शक आणि गुरू आहेत असं ते म्हणालेत.