महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा आहे. त्यापैकी वग हा महाराष्ट्राचा लाडका. पण आता राज्यात जो राजकीय वग सुरु आहे, तो एकंदरच राजकारणाची आणि लोकशाही व्यवस्थेची अब्रू घालविणारा आहे. मागच्या १ वर्षांपूर्वी जे शिवसेनेच्या बाबतीत घडले तेच आता राष्ट्रवादीच्या बातीत घडत आहे. तसा शरद पवारांना पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव आहे आणि फुटीरांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा देखील. मात्र आता तोच डाव त्यांच्या पुतण्याने त्यांच्यावर उलटविला आहे. त्यातून पुन्हा पक्षांतर विरोधी कायद्याचे धिंडवडे साऱ्या राज्याला पाहायला मिळणार आहेत,. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काही निकष ठरवून दिले असले तरी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नशिबी कायद्याची थट्टा उडविणारा राजकीय वग पाहण्याची वेळ आली आहे.
वर्षभरापूर्वी जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती, त्यावेळी पक्षानंतरबंदी कायद्यावरून राज्यभरात खल सुरु झाला होता. कोणाची शिवसेना खरी यावरून वाद सुरु झाल्यानंतर प्रत्येकाने आपापले पदाधिकारी नेमणे, इतरांची हकालपट्टी करणे असले डाव खेळले जात होते. हे सारे सुमारे ७-८ महिने सुरु होते. त्याचा निकाल अखेर लागला. तो लागला का लावला गेला , यावर देखील मोठा काथ्याकूट झालेला आहे. कारण पक्ष एकनाथ शिंदेंकडे देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय वादातीत होता असे म्हणता येणार नाही. सत्तासंघर्षाच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला, त्यातून जी निरीक्षणे नोंदविली ती पाहिली असता निवडणूक आयोगाने घाई केली हे स्पष्टच होते.
आता हे सारे पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे तोच राजकीय वग आता पुन्हा सुरु झाला असून यावेळी सारे कलाकार राष्ट्रवादीचे आहेत. अजित पवारांनी बंड करून आम्हीच खरी राष्ट्रवादी म्हणत सत्तेत सहभाग नोंदविल्यानंतर शरद पवार आक्रमक होणे साहजिकच होते. त्यामुळे त्यांनी डाव टाकायचे आणि अजित पवारांच्या गोताकडून प्रतिडाव टाकाययचे खेळ सुरु झाले आहेत. राजकारणच निव्वळ पोरखेळ कसा असतो हेच यातून दिसत आहे. पक्ष, निष्ठा, विचारधारा हे शब्द आता राजकारणात फारसे कोणी विचारातही घेत नाही, मात्र त्यापलीकडे जाऊन निव्वळच लोकशाहीची आणि पक्षांतरबंदी कायद्याची खिल्ली उडविणारे प्रकार सुरु झाल्याने महाराष्ट्रातील जनता मात्र 'निवडणूक आयोगाने पुढच्या वेळेला आमच्या बोटाला शाई ऐवजी चुना लावावा ' असे म्हणत असेल किंवा समाजमाध्यमांमध्ये 'निवडणूक ओळखपत्र विकणे आहे ' असे ट्रेंड चालत असतील, तर जनता किती वैफल्यग्रस्त झाली आहे हे सहज लक्षात येऊ शकते. आज जरी सत्तेच्या झगमगाटात पुढाऱ्यांना जनतेचे हे वैफल्य किंवा फसविले गेल्याची भावना दिसत नसली , तरी एकदा का सत्तेच्या वावटळीची धूळ खाली बसली की मग मात्र समोर येणारे चित्र भेसूर असणार आहे.
अर्थात आज आम्ही असे म्हणत आहोत , म्हणजे येथे अजित पवारांना दोष देण्याचा किंवा शरद पवारांना समर्थन देण्याचा मुद्दा नक्कीच नाही. पक्षांतराच्या बाबतीत सध्या 'सब घोडे बारा टक्के ' अशीच परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा शपथविधी सुरु होता, त्यावेळी समाजमाध्यमांमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा एक व्हडिओ धुमाकूळ घालीत होता , त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे ' महाराष्ट्रातील पुतण्यांना झालेय तरी काय ? बाळासाहेबांचा पुतण्या फुटला , माझा पुतण्या फुटला, शरद पवार आता तुमची बारी ' असे म्हणत आहेत. म्हणजे जेव्हा इतर कोणी आपल्या पक्षात येतो किंवा आणला जातो , त्यावेळी तो विस्तार असतो आणि आपल्याकडून कोणी इतरत्र जाते ते बंड , गद्दारी असे काही असते. अशी दुटप्पी भूमिका राजकारणात कमी अधिक फरकाने सर्वानीच घेतलेली आहे. आज जे छगन भुजबळ अजित पवारान्सोब्त गेले आहेत, त्यांना राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेमधून कोणी फोडले होते ? महाराष्ट्राला याचा विसर कसा पडेल ? शरद पवारांचे राजकारण हे कायम फोडाफोडीचे राहिलेले आहेच आणि पक्षांतर बंदी कायदा आपल्यापेक्षा चांगला कोणालाच माहित नाही असे स्वतः शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सरकारला जन्माला घालताना जाहीरपणे सांगितले होतेच. म्हणजेच, पक्षानंतरबंदी कायदा खऱ्या अर्थाने पाळायचा कोणालाच नाही. प्रत्येकाला तो आपल्यापरीने वाकवायचा आहे. हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे, आता त्याला घाऊक स्वरूप आले आहे इतकेच. आता फरक इतकाच झालाय, आम्ही पक्षांतर करीत नाही, तर आम्हीच पक्ष आहोत असे सांगण्याची नवी टूम निघाली आहे आणि ही मात्र फार घटक आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी जायला हरकत नसते, मात्र कार्यकर्त्यांनी घामाने खपवून उभे केलेले संघटन चार नेत्यांनी आमचेच म्हणायचे हे पटणारे नसते. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली गेली, त्यावेळीही आम्ही हीच भूमिका मांडली होती, आता राष्ट्रवादीचा नम्बर आहे, उद्या आणखी कोणता पक्ष असेल ते सांगता येत नाही आणि जी महाशक्ती हे सारे घडवीत आलेली आहे, उद्या त्या महाशक्तीच्या बाबतीतच असे घडणारच नाही असेही नाही, कारण राजकारण काय किंवा सत्ताकारण काय हे रहाटगाडगे असते, एकदा भरल्यावर आज ना उद्या रिकामे होणारच असते, म्हणूनच चुकीचे पायंडे पडायला नको असतात . मात्र असल्या चुकीच्या गोष्टींनाच राजमान्यता दिली जाणार असेल तर आता जनतेनेच लोकशाहीच्या भवितव्यासाठी आपण काय करायचे हे ठरविण्याची वेळ आलेली आहे.