अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आले आहे. यादरम्यान आज अजित पवार गटाने त्यांच्या प्रतोदांची नेमणूक केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवरांकडून अनिल पाटील यांच्याकडे पक्षाच्या प्रतोद पदाची जबाबदारी दिली आहे. खुद्द अनिल पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
काल झालेल्या राजकीय भुकंपनानंतर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाचे प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याचं जाहीर केलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र विधानसभा अध्यक्षांना रात्रीत नेऊन दिलं होतं. त्यानंतर आता अजित पवार गटाने देखील त्यांचा प्रतोद जाहीर केला आहे. अनिल पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला त्यांची नियुक्ती झाल्याची माहिती दिली आहे.
व्हिप कोणाचा लागू होणार?
दरम्यान काल जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी पक्षात त्यांचाच व्हिप लागू होणार असे म्हटले होते. त्यानंतर आता अनिल पाटील यांच्या नियुक्तीनंतर आता ते देखील व्हिप जारी करू शकतात. ५ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना बैठकीला बोलवल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र ५ तारखेलाच अजित पवार यांच्याकडून देखील अशीच बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान एकाच दिवशी या दोन बैठका होणार आहेत. त्यामुळे दोन व्हिप जारी केले जाऊ शकतात. यादरम्यान आता संख्याबळ कोणाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.