Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - कोण कोणाचे सांगाती?

प्रजापत्र | Monday, 03/07/2023
बातमी शेअर करा

राजकारणातून निष्ठा हा शब्द केव्हांच हद्दपार झालेला असून पक्ष फोडून सत्ता मिळविणे किंवा सत्तेसाठी पक्ष फोडणे हे आता नेहमीचे झाले आहे. सामान्यांना हे किळसवाणे वाटावे असे असले तरी एकदा निवडून दिल्यानंतर सारे काही पाहत राहण्यापलीकडे जनतेच्या हाती काही राहिलेले नसल्याचा हा काळ आहे. त्यामुळे अजित पवारांनी जे काही केले, त्यामुळे धक्काबिक्का बसण्याचे काहीच कारण नव्हते. आजच्या राजकारणात कोण कोणाचे सांगाती आहेत हे कळत नसले तरी भविष्यात लोक कोणाचे सांगाती राहतात हा मात्र देशासाठी आणि लोकशाहीसाठी देखील धडा ठरेल आणि आता त्याचीच वाट पाहणे जनतेच्या हाती आहे.

 

 

 राष्ट्रवादीमध्ये बंड करुन, अगदी एकनाथ शिंदेंच्याच स्टाईलने अजित पवारांनी एक मोठा गट सत्तेत सहभागी केला आहे. तशी शिंदे- फडणवीस सरकारला स्थैर्यासाठी फारशी गरज नसतानाही भाजपने अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या एका गटाला सरकारमध्ये घेतले यामागे निश्चितच दीर्घकालीन धोरण असेलच, कदाचित उद्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची उपयुक्तता किती असेल याबद्दल भाजप साशंक असल्याने देखील हे घडले असावे, ते हळूहळू समोर येईलच. पण या साऱ्या घटनाक्रमाने सामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अगदीच उडून गेला आहे. अर्थात मागच्या काही काळात देशातले राजकारणच इतक्या खालच्या स्तराला गेले आहे की पक्ष, निष्ठा, मुल्ये, विचारधारा नावाचा काही प्रकार शिल्लकच राहिलेला नाही. आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सत्तेत सहभागी झालो असल्याचे सांगत आहेत तो एकनाथ शिंदेंचाच कित्ता गिरवत आहेत. त्यामुळे उद्या कदाचित शिवसेनेचा अनुभव गृहीत धरला तर राष्ट्रवादीची सुत्रे अजित पवारांकडे जाऊ शकतीलही, पण त्यामुळे लोक अजित पवारांसोबत राहतील का हा मोठा प्रश्न आहे, आणि म्हणूनच कदाचित पक्षाचे काय होईल, चिन्हाचे काय होईल याची चिंता करताना शरद पवार दिसत नाहीत. उद्या वेळ आलीच तर आम्ही न्यायालयात नाही तर जनतेत जाणार आहोत असे जेव्हा शरद पवार सांगतात त्याला अर्थ नक्कीच आहे. आजच्या राजकारणात कोण कोणाचे सांगाती असतील आणि किती दिवस असतील हे सांगताच येत नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आज अजित पवारांसोबतच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत देखील अस्वस्थता आहेच. शिंदे सेनेतील ज्या अनेकांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, भाजपच्या ज्या लोकांना मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांचे काय? हे अस्वस्थ लोकं काय करणार? आणि या सर्वांच्या पलिकडे जाऊन शतप्रतिशत साठी संकल्पबधद असलेला मुळ भाजप, शिदेंची शिवसेना आणि आता अजित पवारांसोबतची राष्ट्रवादी यातले अनेक चेहरे स्थानिक पातळीवर परस्परांचे कट्टर विरोधक, आता या सर्वांनी एकत्र चालायचे कसे? आणि सर्वांच्याच राजकीय अपेक्षा पूर्ण कशा होणार, मग यातून जी अस्वस्थता निर्माण होणार आहे, त्याचे काय? हे सारे प्रश्न राज्याच्या भविष्यातील राजकारणासाठी महत्वाचे असतीलच, म्हणूनच आता जेव्हा शरद पवार पुन्हा जनतेत जाण्याची भाषा बोलतात त्यावेळी त्याला अर्थ निश्चितच असतो. शरद पवारांना पक्ष, चिन्ह बदलत राहून पुन्हा पुन्हा संघटन उभे करण्याचा आणि जनतेत जाण्याचा अनुभव नवा नाही. १९८० ला त्यांचे ५८ पैकी ५२ आमदार सोडून गेले होतेच, आणि उरलेल्या ६ लोकांना सोबत घेऊन त्यांनी पुन्हा ६९ आमदार निवडून आणले होतेच. अर्थात १९८० ची राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि १९८० चे शरद पवार आणि आजची परिस्थिती आणि आजचे पवार यात मोठा फरक असल्याचे मान्यच करावे लागेल. मात्र आता पवार जी साद जनतेला आणि तरुणाईला घालणार आहेत, त्याला जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो आणि एकंदरीतच जनता फोडाफोडीच्या सत्तालोलूप राजकारणाची सांगाती होणार का वेगळा निर्णय घेणार यावरच आपल्या लोकशाहीची वाटचाल देखील अवलंबून राहणार आहे.

Advertisement

Advertisement