बीड दि.३०(प्रतिनिधी)- मागच्या वेळी आपल्याला दूध पोळलं, आता ताकही फुंकून प्यायचय, मागच्या काळात खूप अनुभव आले.आता माझी भूमिका मी घेतली आहे, त्या भूमिकेशी पक्षाला सहमत करण्याचा मी प्रयत्न करेल पण आता मला आणि राजेंद्र मस्केंनाही विजयी करा या शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत:ची राजेंद्र मस्केंची उमेदवारीच जाहिर केली आहे. यामुळे बीडच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळणार आहे.
बीड येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या आयोजनातून बैलगाडा शर्यत पार पडली. त्याचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारणाबद्दल भूमिका जाहिर केल्या. मला काही मिळालं नाही की कार्यकर्त्यांना घोर निराशा येते. पण आता ते सोडा. मागच्या काळात आपल्याला खूप अनुभव आले. विधानसभेला दुधही पोळले. त्यामुळे आता ताकही फुंकून प्यायचे आहे. बीड जिल्ह्यात मी पालकमंत्री असताना भरपूर निधी दिला, मात्र आता कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत.आईची माया दाईला येत नसते. पण आता मी माझी भूमिका ठरवली आहे. माझ्या भूमिकेसोबत पक्ष येईलच, मी त्यासाठी प्रयत्न करेल, पण आगामी निवडणुकीत मला आणि राजेंद्र मस्के यांनाही निवडून द्या, असे आवाहनच पंकजा मुंडे यांनी केले. यामुळे आता बीड विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडेंनी राजेंद्र मस्के यांची उमेदवारीच जाहिर केल्याचे स्पष्ट होत आहे.