Advertisement

भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

प्रजापत्र | Friday, 30/06/2023
बातमी शेअर करा

सिंधुदुर्ग - छत्रपती शिवाजी महाराज  यांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिन यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होत आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा संकल्प भारतीय नौदलाने केला आहे. महाराजांनीच त्याकाळी पाहिलं नौदल सुरु केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे जनक आहेत. 

भारतीय नौदलाने किल्ल्यात महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र, पुतळा किल्यात कोणत्या ठिकाणी उभारला जाईल, त्याची भव्यता किती असेल, याबाबतची स्पष्टता स्थानिक प्रशासनाला दिलेली नाही. परंतु पुतळा लक्षवेधी असेल एवढे नक्की. 

 

सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यासाठी नौदलाकडून जय्यत तयारी
मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर तसेच सभोवतालच्या समुद्रात भारतीय नौसेना दिन साजरा होणार आहे. या निमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहेय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यासाठी नौदलाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. तसा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने कामालाही लागते आहे. या सोहळ्याच्या प्राथमिक तयारीचा भाग म्हणून 18 मे रोजी स्टर्न नेक कमान प्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांनी सिंधुदुर्ग किल्ला परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. 3 आणि 4 डिसेंबर असे दोन दिवस सोहळा रंगत असणार मात्र मुख्य कार्यक्रम 4 डिसेंबरला होईल.

 

सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन होणार
4 डिसेंबर हा दिवस 'भारतीय नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो. जगात चौथ्या क्रमांकाची बल्याढ्य नौदल म्हणून भारतीय नौदलाची जगात ओळख आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जो वज्राघात केला होता, त्यामुळे पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. या वज्राघाताने भारतीय नौदलाची खरी ताकद साऱ्या जगाला कळून चुकली आणि त्यामुळेच 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून दरवर्षी साजरा करते. या विजय दिवसाच्या निमित्ताने देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय नौदल संपूर्ण जगासमोर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करते. यावर्षी हा भारतीय नौदल दिन महाराष्ट्रातील जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात सामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 70 लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत. 

Advertisement

Advertisement