विनायक मेटे यांच्या अकाली जाण्यामुळे केवळ मेटे कुटुंबालाच पोरकेपण जाणवतंय असं नाही, तर राजकारणात,समाजकारणात काम करणाऱ्या शिवसंग्रामच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून ते मेटे साहेबांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला एक मोठ्ठी पोकळी आजही जाणवतेय.मी गावागावात फिरताना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तो पोरकेपण दिसत आहे,म्हणूनच आता या समाजासाठी, विनायक मेटे साहेबांनी समाजकारणातून जी काही स्वप्ने पहिली, त्या स्वप्नांसाठी सक्रिय राहायचे आहे. त्यांनी समाजासाठी पाहिलेली आणि अर्धवट राहिलेली स्वप्नं कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहेत या शब्दात दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी,सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी तथा शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योती मेटे यांनी आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा स्पष्ट केली. विनायक मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'प्रजापत्र 'ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न-खरं तर आजही प्रत्येक व्यक्तीला विनायक मेटे यांच्या वाढदिवसाला जयंती म्हणणं जड जातंय,आज आपल्या काय भावना आहेत?
डॉ.ज्योती मेटे-तुम्ही जे सांगतायच त्याच भावना केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही,तर शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांच्या,समाजातील नागरिकांच्या आहेत.आज साहेबांचा वाढदिवस,पण त्याला जयंती म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र हे दुःख देखील स्विकारणं भाग आहे.
प्रश्न-दिवंगत विनायक मेटे यांच्यानंतर आता आपण समाजकारणात सक्रिय व्हावं आणि कार्यकर्त्यांना आधार द्यावा अशी भावना आहे
डॉ.ज्योती मेटे-खरं तर असे जे निर्णय असतात,ते सोपे नसतात.आज माझ्यावर मेटे कुटुंबाची जबाबदारी तर आहेच.पण मागच्या काही महिन्यात मी जे फिरतेय, जे लोक भेटत आहेत, त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत.येणार प्रत्येकजण साहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे सांगत असतो. प्रत्येकाकडे साहेबांच्या बाबतची स्वतःची अशी एक स्टोरी आहे.त्यांनी कोणाला,कशी,कोठे मदत केली याचा अनुभव आहे.आणि म्हणूनच त्या प्रत्येकाला साहेबांच्या जाण्याने स्वतःच्या जवळचं कोणीतरी गमावल्याचे दुःख आहे.ते पोरकेपण आहे.आता या प्रसंगात त्यांना आधार देणं ही देखील जबाबदारी मला पार पडायची आहे.
प्रश्न- ही जबाबदारी पार पडताना आपणास राजकारण,समाजकारणाचा अनुभव आहे का ? मेटे साहेब कधी या विषयांवर आपल्याशी बोलायचे का ?
डॉ. ज्योती मेटे-प्रश्न राजकारण,समाजकारणाच्या अनुभवाचा नाही.राजकारणाबद्दल मला आजही काही बोलायचं नाही.मात्र समाजकारणाबद्दल सांगायचं तर मेटे साहेबांच्या सर्व प्रवासाची मी साक्षीदार आहे.आम्ही एकमेकांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करीत नव्हतो.ते लग्नाच्या वेळीच ठरलं होत.मात्र साहेब त्यांच्या प्रत्येक निर्णयात मला सहभागी करून घ्यायचे.आमची प्रत्येक गोष्टीवर चर्चा व्हायची.मराठा आरक्षणाचा विषय असेल,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा विषय असेल किंवा आणखी कोणताही सामाजिक मुद्दा, त्याबद्दल आमची चर्चा व्हायची.
प्रश्न- मेटे साहेबांच्या अकाली जाण्यामुळे शिवसंग्राम विखुरले असे वाटत होते,मात्र आजच्या अस्थिर राजकीय,सामाजिक परिस्थितीमध्ये देखील शिवसंग्राम एकसंघ उभी राहिली,हे नेमके काय आहे असे तुम्हाला वाटते ?
डॉ.ज्योती मेटे-मुळात राजकारणात,समाजकारणात नेता गेल्यानंतर कार्यकर्ते सैरभैर होत असतात, हे वास्तव आहे.पण शिवसंग्रामचा एकही कार्यकर्ता संघटना सोडून गेला नाही, हे क्षेत्र आश्चर्यच आहे.पण यामागचे कारण देखील मेटे साहेबांची त्या प्रत्येकासोबत जी बांधिलकीची भावना होती, मला वाटते तेच कारण असेल. मेटे साहेबांनी सामान्यांना उभे करण्याचे काम केले, त्यामुळे आपल्या आयुष्यात साहेबांचे काही योगदान आहे असे वाटणाऱ्या प्रत्येकाची शिवसंग्राम ही संघटना आहे. म्हणून देखील आजही शिवसंग्राम एकसंघ आहे.
प्रश्न- विनायक मेटे यांचा सारा प्रवास संघर्षाचा होता,आता या संघर्षाचे पुढे काय ?
डॉ.ज्योती मेटे-खरं तर विनायक मेटे हे नाव म्हणजेच खूप मोठा संघर्ष होता.आमच्या लग्नानंतर, ९८ नंतर हा संघर्ष, त्यांचं समाजकारणात प्रस्थापित होण्याचा प्रयत्न,त्यातली फरफट हे सारं मी जवळून पाहिलं आहे. पण त्या प्रत्येक प्रसंगात त्यांची जिद्द असायची, ते जिद्दीने पुढे जायचे.त्यांनी संघर्षातून जे उभारलं ते पुढं नेण्याची आवश्यकता आहे. समाजासाठी काम करीत राहण्याची नियतीने हिरवलेली त्यांची संधी शिवसंग्रामच्या माध्यमातून पुन्हा मिळवून द्यायला हवी.
प्रश्न- या प्रवासाचं नेमकं स्वरूप कसं असेल ?
डॉ.ज्योती मेटे-मेटे साहेबांनी जी स्वप्ने पहिली होती, समाजासाठी,त्यांनी ज्या सामाजिक प्रश्नांना हात घातला होता, मग तो विषय आरक्षणाचा असेल, शिवस्मारकाचा असेल किंवा आणखी इतर, ते प्रश्न शेवटपर्यंत तडीस नेणार आहोत. त्यात कोठेच तडजोड होणार नाही . साहेब हे कार्यकर्ता जास्त होते. त्याच भावनेतून शिवसंग्राम पुढे जाणार आहे. साहेबांनी वंचितांसाठी जे जे काही करु घातलं त्यात तडजोड होणार नाही.
प्रश्न- पण पुढची लढाई सोपी असेल ?
डॉ. ज्योती मेटे-ही लढाई विषम लढाई आहे याची आम्हाला जाणीव आहे.जिथे साहेबांना स्वतःला मोठा संघर्ष कायम करावा लागला,तिथे हे सोप्प कसं आले ?पण साहेबांनी उभा केलेला प्रत्येक सामान्य माणूस हाच आमचा दारुगोळा आहे.
प्रश्न- आपण मेटे साहेबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याबद्दल बोलत आहेत, त्यांच्या इतर स्वप्नांप्रमाणेच त्यांना विधानसभेत पाहायचं हे कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं,त्या स्वप्नच काय ?
डॉ.ज्योती मेटे-त्याबद्दल योग्यवेळी निर्णय घेऊ.आज मात्र एक दिवस समाजासाठी ... साहेब तुमच्यासाठी हेच आमचं सूत्र आहे.