बीड - जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी मारूती जाधव यांच्या तीन मुली महाराष्ट्रपोलिसांत भर्ती झाल्या आहेत. आपल्या मुलींची गरूडझेप पाहून मारूती जाधव यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या मुलींनी जिल्ह्याचे नाव रोशन केल्याचा अभिमान असून त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बीडमधील परळीतील सेलू तांडा गावात राहणाऱ्या मारुती जाधव यांनी ऊसतोड कामगार म्हणून काम सुरू केले होते. काही काळ ऊसतोड कामगार म्हणून काम करून त्यांनी घर चालवले. गावात त्यांच्याकडे स्वत:ची जमीन किंवा कोणतीही मोठी मालमत्ता नव्हती. मात्र, तीन मुली आणि दोन मुले असा मोठा परिवार त्यांचा आहे. अशा परिस्थितीत मोठं कुटुंब चालवण्यासाठी त्यांना दिवसरात्र मेहनत करावी लागली.
गरीब शेतकऱ्याच्या मुली पोलिसात भर्ती
घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील मारूती जाधव यांनी आपल्या पाचही मुलांच्या शिक्षणात कोणताही हलगर्जीपणा केला नाही. त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार मुलांना शिक्षण दिले. खरं तर त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मारूती जाधव यांची मोठी मुलगी सोनाली कोरोना काळात पोलिसात भर्ती झाली होती. तर दुसरी मुलगी शक्ती आणि तिची लहान बहीण लक्ष्मी अलीकडेच महाराष्ट्र पोलीस झाली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुली पोलिसात भर्ती होण्याचे परळीतील हे पहिलेच उदाहरण आहे.