वारकरी संप्रदाय असेल किंवा भागवत संप्रदाय, या भक्ती संप्रदायाने अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार केला आणि तोच विचार जगाला दिला. मानवतावाद आणि बंधूभाव हेच वारकरी संप्रदायाचे शक्तीस्थान आहे. 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या पसायदानातून संत ज्ञानेश्वरांनी दिलेला विचार असेल किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर असे सांगत तुकारामांनी समोर मांडलेला विचार असेल, आज धर्माच्या नावाखाली विद्वेष पसरविण्याचे प्रयत्न जोरात होत असताना खरा धर्म हा मानवताधर्म आहे हा संत विचार रुजविण्याची सर्वाधिक आवश्यकता आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशभरात अगदी १२ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या भागात जो भक्तिसंप्रदाय वाढीस लागला आणि ज्या संप्रदायाने संस्कृतीला एक दिशा दिली, त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या वारकरी संप्रदाय अथवा भागवत संप्रदायाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाला आराध्य मानून संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांच्या मार्गे अगदी गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत आणि संत जनाबाईपासून संत कान्होपात्रा, बहिणाबाईपर्यंत संतसाहित्य आणि संतविचारांमधून मानवतावादाचे तत्वज्ञान या महाराष्ट्रात रुजविण्यात आले आहे. याच विचारांवर इथली भूमी पोषक झालेली असून हाच आपल्या मातीचा खरा धर्म आहे, हीच आपली खरी संस्कृती आहे. या संस्कृतीनेच महाराष्ट्राला इतर राज्यांपासून वेगळे आणि पुरोगामी केले, किंबहुना महाराष्ट्राने जे अनेकदा सामाजिक, राजकीय चळवळींचे नेतृत्व केले, त्यामागे देखील हा संतविचारच राहिलेला आहे.
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात राज्यभरातून भक्तसागर पोहचलेला असून हा भक्तसागर हा सामान्यांचा आहे. कोणत्याही विद्वेषापासून दूर असलेला हा भक्त परिवार आहे. कारण विठ्ठलाचं भक्त म्हटल्यावर कोणाचा मत्सर तो करणार नाही हेच अपेक्षित आहे. संत तुकारामांनी 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' हेच सर्वेश्वर म्हणजे ईश्वर पूजनाचे वर्म असल्याचे सांगितलेले आहे.
जातीभेद असतील किंवा वर्णभेद याला देखील विठ्ठलभक्तीमध्ये थारा नाही. किंबहुना भक्तीसंप्रदायातच असल्या कोणत्याही भेदाला स्थान नाही हे संतांनी स्पष्ट केले म्हणूनच वारकरी संप्रदाय ही आपल्या महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. खरा धर्म या संस्कृतीमध्ये आहे. सर्वांना सामावून घेणारा आणि त्याचवेळी इतर श्रद्धांचे सहअस्तित्व मान्य करून त्यांना विरोध न करणारा हा संप्रदाय खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देत आलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या या काळात याच विचारांची कधी नव्हे इतकी गरज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला निर्माण झालेली आहे.
आज धर्माच्या नावावर विद्वेष पसरविण्याचे काम जोरात होत आहे. भावना दुखावल्याच्या नावाखाली किंवा इतर कोणत्याही कारणाने माणसामाणसात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न कांहीं प्रवृत्ती जाणीवपूर्वक करीत आहेत आणि यामुळे मानवतेलाच धोका निर्माण होईल असे चित्र या संतांच्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अगदी ज्या वारीने कायम सकारात्मकता आणि भूतदया शिकविली, त्या वारीमध्ये देखील धारकरी घुसविण्याला धर्म ठरविले जात असेल तर विठ्ठल हाच जगण्याचा विचार आणि विठ्ठल हाच जीवभाव मानणाऱ्या सर्वांनीच या परिस्थितीचा विचार करण्याची वेळ आली आहे. संत विचारांमधून आलेला भ्रातृभाव, सर्वांप्रती संभव, मत्सर, देवापासून मुक्तीची भावना आणि या सर्वांच्या ही पलीकडे जाऊन 'योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा' या टोकाचा
क्षमाशीलपणा ज्या संस्कृतीने शिकविला त्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत हे देखील विद्वेष पसरविणारांना सांगणे आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने हीच विठ्ठल भक्ती आहे.
आज आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानंतर या संस्कृतीमधील बहुसंख्यांकांच्या भावनांचा आदर म्हणून जर कोणी आपल्या धर्मश्रद्धा एक दिवस बाजूला ठेवणार असतील तर अशा कृतींना तितक्याच सकारात्मकतेने प्रतिसाद देण्याची देखील समाजाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान असणे हे देखील खऱ्या भक्ताचे लक्षण आहे.