Advertisement

हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेलेल्या डॉक्टरला डोक्याला पिस्टल लावत धमकावले

प्रजापत्र | Tuesday, 27/06/2023
बातमी शेअर करा

औरंगाबाद - मराठी गाणे लावले म्हणून त्याला विरोध करत दोन व्यावसायिकांनी पार्टी करत असलेल्या डॉक्टरच्या कपाळावर पिस्टल रोखले. त्यानंतर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न करणे, आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून मॅक्स हबीब अब्दुल शकूर (५७, रा. एन-१, सिडको) आणि जगजितसिंग सुरिंदरसिंग ओबेरॉय (५२,रा.ज्योतीनगर) यांना अटक करण्यात आली.

 

 

गेवराई येथील डॉ.दीपक फाटक, (वय - ३४) रा.धानोरा हे २५ जून रोजी रात्री १०.३० वाजता चार मित्रांसह आकाशवाणी येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे अचानक त्यांनी मराठी गाणे लावण्याची मागणी केली. मात्र, त्यातून मॅक्स व जगजितसिंग या दोघांनी त्याला विरोध करत गाणे बंद करण्याची मागणी केली. त्यातून त्यांच्यात वाद झाले व मॅक्सने थेट पिस्टल काढून फाटक यांचा डॉक्टर मित्र एकनाथ पवार यांच्या डोक्याला लावत पिस्टलची मूठ डोक्यात मारली. इतरांना देखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फाटक यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. त्यानंतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल करत अटक केली. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे भंडारे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement