आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या, त्याहीपेक्षा इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व इंदिरा विरोधकांना एकत्र करण्याचे काम झाले होते, त्यावेळी विरोधीपक्षांकडे जयप्रकाश नारायण यांच्यासारखा चेहरा होता. आजही देशातली परिस्थिती अधिकृत आणीबाणीची नसली तरी एककल्ली राजकारणाचीच आहे. आज भाजपच्या, किंबहुना मोदी शहांच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र या सर्वांना एकत्र बांधून ठेवेल असा जेपींसारखा निस्पृह चेहरा आज तरी भारतीय राजकारणात नाही. त्यामुळे आता विरोधी पक्षातील सर्वांनाच, जर खरोखर भाजपला तुल्यबळ विरोध करावा असे वाटत असेल तर व्यक्तिगत अजेंडे आणि अहं, कोण मोठा, कोण लहान हे सारे विषय बाजूला ठेवावे लागतील. आज होत असलेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीतून तेच अपेक्षित आहे.
नितीश कुमार यांच्या पुढाकारातून आज पाटण्यात भाजप विरोधकांची बैठक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, समाजवादी, तृणमूल, द्रमुक, शिवसेना (उबाठा) आदी अनेक पक्ष यात सहभागी होणार आहेत. केसीआर यांचा पक्ष बैठकीला येईल असे वाटत नाही. स्वतः नितीस कुमार यांनी पुढाकार घेतलेला असल्याने त्यांचा पक्ष आणि राजद हे यजमानाच्या भूमिकेत असतिल. या बैठकीपुर्वीच नितीश कुमार यांनी आपण पंतप्रधानपदाचा चेहरा नाही हे स्पष्ट केले आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.
आजघडीला भाजपच्या एककल्ली, हुकूमशाही राजवटीबद्दल सारेच बोलतात, अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनी देखील वटहुकुमांच्या माध्यमातून कशी बगल दिली जात आहे हे सध्या सारेच अनुभवत आहेत. जे दिल्लीच्या बाबतीत होत आहे, ते इतरांच्या बाबतीत होणारच नाही, याची शाश्वती देता येत नाही. आज मणिपूर अनेक दिवसांपासून जळत आहे. महाराष्ट्रसारख्या राज्यात अनेक दंगली घडल्या, पण त्याच्या मुळाशी सरकार जात नाही. दिल्लीत खेळाडूंना आंदोलन करावे लागते, कोणी आंदोलन करणार म्हटले तर ते दडपण्याचा उद्योग होत आहेत. त्यासाठी साऱ्या सरकारी यंत्रणा कामाला लावल्या जातात. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी जी आणीबाणी देशावर लादली होती, त्यात यापेक्षा काही वेगळे होत नव्हते. त्यामुळेच आज जे काही होत आहे, त्याला अधिकृतपणे आणीबाणी म्हणता येत नसले तरी सारे काही त्याच वाटेवर जाणारे आहे.
आणीबाणीच्या काळात ज्यावेळी अतिरेक झाला होता, त्यावेळी साऱ्या विरोधकांनी एकत्र येऊन 'सिंहासन खाली करो , की जनता आता है' अशी घोषणा दिली होती. मात्र त्यावेळी सर्व विरोधकांना एकत्र करणारा जेपींसारखा (जयप्रकाश नारायण ) चेहरा होता. ज्यांच्या निस्पृहतेबद्दल सर्वांना आदर होता. त्यावेळच्या जनसंघाला सोबत घेण्याच्या त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आज वेगळा मतप्रवाह मांडला जात असला तरी त्यावेळी सर्व विचारधारांना 'लोकशाही रक्षणाच्या ' एका कार्यक्रमावर एकत्र आणण्यात त्यांना यश आले होते. कारण ते स्वतः सत्तेपासून अलिप्त राहणारे होते .
आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या, भाजपच्या विरोधात 'लोकशाही रक्षणासाठीच' सर्वांनी एकत्र येणायची हाक दिली जात असली तरी सर्वांना एकत्र करायचे कोणी हा फार मोठा प्रश्न आहे. जेपी तर दूर त्यांच्या पासंगालाही पुरेल असा सर्वमान्य चेहरा कोण हा विरोधकांसमोरचा मोठा प्रश्न असणार आहे. नितीश कुंमर आज भलेही सर्वांना एकत्र करीत आहेत , मात्र त्यांच्या राजकीय भूमिका कायम दोलायमान राहिलेल्या आहेत. शरद पवार थेट भाजसोबत गेलेले नसले तरी त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल ठामपणे कोणीच खात्री देत नाही, हे त्यांनीच निर्माण केलेले स्वतःचे वलय आहे. तृणमूल काय किंवा द्रमुक काय, शिवसेना (उबाठा) काय हे पक्ष प्रादेशिक अस्मिता गोंजारणारे आहेत, त्यामुळे त्यांचे स्वतःचे अजेंडे वेगळे असून ते प्रत्येक ठिकाणी स्वतःचा कथित मोठेपणा गोंजारणारे आहेत. आपला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असून त्यात त्यांचा प्रमुख अडसर काँग्रेस आहे. तृणमूलला डावे नको आहेत. असे अनेक अंतर्विरोध आहेतच. आणि राहता राहिला काँग्रेसचा प्रश्न, आज काँग्रेसला सर्वदूर मोठेपण द्यायला कोणीच तयार नाही आणि काँग्रेस दुय्यमपणा किती स्वीकारेल हे सांगता येत नाही. आणि हा अंतर्विरोधाचं नरेंडनर मोदी आणि भाजपची शक्ती आहे.
याचा अर्थ विरोधी पक्षाच्या बैठक होऊ नयेत असे नाही, त्या झाल्याचं पाहिजेत. कितीही अंतर्विरोध असला तरी सुरुवात तर झाली पाहिजे . पण केवळ एकत्र बैठक करून भागणार नाही, तर त्यासाठी स्वतःचे अजनेडे बाजूला ठेवून किमान सामान कार्यक्रमावर विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी अगोदर 'आम्हीच मोठे' हा अहं बाजूला ठेवण्याची मानसिकता प्रत्येकाला करावी लागणार आहे. आजच्या बैठकीतून त्याची सुरुवात व्हावी अशी अपेक्षा.