राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीच. अजित पवार यांनी पक्षाच्या पातळीवर कितीही प्रमाद करोत, पण अजित पवार ही आज तरी राष्ट्रवादीची गरज आहे. पक्षाच्या पातळीवर शरद पवार भलेही अधून मधून अजित पवारांना धक्के देण्याचा प्रयत्न करीत असतील, मात्र अजित पवारांना वगळण्याची मानसिकता राष्ट्रवादी करुच शकत नाही, आणि अजित पवार देखील राष्ट्रवादीत कितीही अस्वस्थ असले तरी त्यांचे राजकीय ठिकाण राष्ट्रवादीचं आहे हे नक्की, म्हणूनच आता अजित पवारांना संघटनेत जबाबदारी हवी आहे. अजित पवार ज्यावेळी एखादे विधान जाहीरपणे करतात, त्यावेळी ते सहज केलेले नसते, कदाचित पवारांच्या अंतर्गत गोटात हे पूर्वीच ठरलेले असेलही, फक्त ते जनतेतून किंवा कार्यकर्त्यांमधून यावे आणि यासाठी चर्चेचे तोंड फोडले जावे यासाठी तर हे सारे नसेल ना असे वाटायला वाव आहे. म्हणूनच आता राष्ट्रवादीला राज्यात देखील भाकरी फिरवावी लागेल हे नक्की.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी थेट शरद पवारांसमोरच 'मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा' अशी आर्त हाक काकांना घातली आहे. त्याचवेळी आपल्याला संघटनेत काम करण्याची इच्छा आहे असेही त्यांनी बोलून दाखविले आहे. राजकारणात अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते सहसा त्यांच्या राजकीय भावना असतील किंवा आकांक्षा असतील, लपवून ठेवत नाहीत हा देखील आजपर्यंतचा अनुभव आहे. राज्याच्या राष्ट्रवादीची सूत्रे आपल्याकडेच राहावीत ही अजित पवारांची अनेक वर्षांपासूनची सुप्त इच्छा आहे. मात्र मागच्या काळात राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे अजित पवारांशी पटेल का हा मोठा प्रश्न होता. त्यातही शरद पवारांच्या जवळचे म्हणून जे नेते आहेत, त्यांच्याशी अजित पवार फटकून वागतात असे चित्र पाहायला मिळायचे. मात्र मागच्या काही काळात अगदी छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याचे देखील अजित पवारांशी सूत जुळल्याचे चित्र आहे. त्यामुळेच केंद्रीय राजकारणात शरद पवारांनी पक्षातील भाकरी फिरविल्यानंतर अजित पवारांना त्याबद्दल फारसे काही आक्षेप नव्हते. मुळात अजित पवार एकदा खासदार राहिले असले तरी त्यांना दिल्लीचे राजकारण कधी फारसे रुचले नाही. त्यांना रस आहे तो राज्याच्या राजकारणात. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे दिल्लीत सक्रिय होणार असतील तर अजित पवारांसाठी ते सोयीचेच आहे,
म्हणूनच शरद पवारांनी दिल्लीतली भाकरी फिरविल्यानंतर आता त्यांनी राज्यातही भाकरी फिरवावी अशी अजित पवारांची इच्छा असणारच. म्हणूनच ती इच्छा बोलून दाखविण्यासाठी त्यांनी पक्षाच्या बैठकीचा मुहूर्त निवडला आणि काकांसमोरच 'मला संघटनेत पद द्या, मग पहा पक्ष कसा चालतो' असे थेट सांगितले आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संबंध कसे आहेत हे कांहीं वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणूनच अजित पवार जेव्हा 'पहा मी पक्ष कसा चालवून दाखवितो ' असे सांगतात, त्यावेळी त्यांचा निशाणा जयंत पाटलांवरच असतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. जयंत पाटील हे आज घडीला राज्यातील शरद पवारांचे सर्वात विश्वासू नेते आहेत. मात्र असे असले तरी अजित पवारांना अव्हेरणे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनाही ना पूर्वी शक्य होते, ना उद्या शक्य होणार आहे. अजित पवारांच्या राजकीय भूमिकांबद्दल अनेक आक्षेप असतीलही, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आजही अजित पवारांची क्रेझ आहे. किंबहुना अजित पवारांना वगळून राष्ट्रवादी असा विचार आज तरी महाराष्ट्रात करता येणार नाही. त्यामुळेच तर अजित पवारांनी काहीही केले, तरी त्यांच्याशी जुळवून घेण्याचीच भूमिका पक्षाला घ्यावी लागलेली आहे. अर्थात अजित पवारांनाही राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. ते भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून जाऊ शकतील कदाचित, पण थेट भाजपात जाऊन अजित पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतील असे शक्यच नाही. म्हणूनच अजित पवारांचे राजकीय ठिकाण देखील राष्ट्रवादीचं आहे, आणि या गोष्टींची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवारांनाही आहे, म्हणूनच आता खा. सुप्रिया सुळेंकडे दिल्लीची जबादारी दिल्यानंतर अजित पवारांकडे राज्यची सूत्रे सोपविली जातील, किंबहुना तसेच काही पवारांच्या अंतर्गत गोटात ठरलेही असेल. त्याशिवाय अजित पवार शरद पवारांच्या समोरच असे काही बोलणार नाहीत, जे काही करायचे आहे, ते इतरांकडून सूचविले जावे आणि नंतर श्रेष्ठींनी त्यांना अपेक्षित असलेले ते करावे अशी पूर्वीच्या गावगाड्यात प्रथा होती , त्यामुळे आता राज्यातील भाकरी फिरविण्याचा विषय देखील चर्चेला यावा आणि पुन्हा सर्वांचा आग्रह आहे असे सांगत अजित पवारांकडे सूत्रे दिली जावीत यासाठी तर हा सायास नसेल ना ?