औरंगाबाद - औरंगाबाद शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न भंगल्याने खचलेल्या तरुणीने थेट विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दामिनी पथक व एमआयडीसी सिडको पोलिसांना वेळीच ही माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. विशेष म्हणजे आधी या तरुणीने रात्रीच्या सुमारास घर सोडले आणि संपूर्ण रात्र बसस्थानकात काढली. त्यानंतर विषारी द्रव्य प्राशन केले होते. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृतीला कोणताही धोका नाही.
अधिक माहितीनुसार, मंगळवारी (20 जून) नियंत्रण कक्षाला कॉल आला. या कॉलची माहिती घेऊन पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, पोलिस उपनिरीक्षक अनिता फसाटे यांच्या आदेशान्वये दामिनी पथकाच्या लता जाधव, कल्पना खरात, संगीता परळकर, निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, मानकर, रूपा साखला, मनीषा बनसोडे, अंबिका दारुंटे सिडको बसस्थानकावर पोहोचल्या. तेथे त्यांना 19 वर्षीय तरुणी दिसली. ती बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे तिने पथकाला सांगितले.
पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, या तरुणीने सोमवारी (19 जून) रोजी रागाच्या भरात घर सोडले होते. ती सैन्यात भरती होण्यासाठी मेहनत घेत होती. मात्र, अवघ्या काही गुणांनी तिची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे ही तरुणी खूप तणावात होती. त्यातच तिने घर सोडले आणि सिडको बसस्थानकात आली. तेथेच रात्र काढली. पोलिस विचारपूस करीत असतानाच तिला चक्कर आली. तेव्हा तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे समजले. दामिनी पथक व एमआयडीसी सिडको पोलिसांनी तिला तत्काळ मिनी घाटीत दाखल केल्याने तिचा जीव वाचला.
मोठ्या कष्टानंतरही अपयश...
बुलडाणा जिल्ह्यातील असलेली ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होती. आपली सैन्यात निवड व्हावी या अपेक्षेने ती सराव करत होती. भल्या पहाटे उठून धावणे आणि इतर सराव सुरु होता. दरम्यान एवढं सर्व कष्ट करून देखील सैन्यात भरती न झाल्याने ही तरुणी खचली होती. त्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिने विष प्राशन केलं.
पोलिसांमुळे जीव वाचला....
या मुलीने रात्रीच्या सुमारास सिडको बसस्थानक गाठले आणि रात्र तिथेच काढली. दरम्यान याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस नियंत्रण कक्षाने याची माहिती तत्काळ दामिनी पथकाला दिली. जेव्हा दामिनी पथक घटनास्थळी पोहचले त्यावेळी मुलीला चक्कर येत असल्याचे पाहून त्यांनी तिला तत्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तिने विष प्राशन केल्याचे डॉक्टरांना सांगितले. पण वेळीच पोलिसांना तिला रुग्णालयात दाखल केल्याने या मुलीचा जीव वाचला.