Advertisement

लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण!

प्रजापत्र | Wednesday, 21/06/2023
बातमी शेअर करा

 

आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी केलेली आहे. आता या वारकऱ्यांना विमा संरक्षणाची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारकऱ्यांना तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे. 

 

वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात, वारीमध्ये वाहन घुसणे अशा दुर्घटना अनेकदा होतात. या घटनांना विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी शासनाने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू केली आहे. याचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

 

वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच वारीदरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. 

 

आषाढ एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. राज्यासह अन्य राज्यातील भाविकांची गर्दी पंढरपुरात होते. आलेल्या सर्व भाविकांची सोय व सेवासुविधा पुरविण्यासाठी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. 

 

 

Advertisement

Advertisement