अंबाजोगाई दि.१८ (प्रतिनिधी)-तालुक्यातील मांडवा रोडवर काळवटी तांडा नजीक एक मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. अखेर अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगाड्याच्या गळ्यातील एका माळेवरून या जटील खून प्रकरणाचा छडा लावण्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून या गर्भवती महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा नजीक रस्त्याच्या बाजूला दरीत मानवी सांगाडा आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सांगाडा ताब्यात घेऊन स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरिक्षक राजेंद्र घुगे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.सापडलेला सांगाडा पुरुषाचा आहे कि महिलेचा, आत्महत्या आहे की खून इथपासून तपासाची सुरुवात पोलिसांना करावी लागणार होती. प्रकरणाची क्लिष्टता लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी वैयक्तिक या तपासात लक्ष घातले. त्यांच्या आणि पोलीस निरिक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घुगे यांनी तपास सुरु केला. मृतदेहाच्या गळ्यामध्ये एक माळ पोलिसांना आढळून आली होती. अशी माळ शक्यतो विधवा महिला गळ्यात घालतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी राज्यभरातील विशेषतः बीडसह आजूबाजूच्या कोणत्या जिल्ह्यात विधवा महिला बेपत्ता आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी सीसीटीएनएस, सोशल मिडिया, बातम्या यांचाही आधार घेण्यात आला. दरम्यान, सोनपेठ (जि. परभणी) येथील ठाण्यात साधर्म्य असणारी महिला बेपत्ता असल्याचा सुगावा पोलिसांना लागला.
गर्भपातासाठी कागदपत्रे देत नसल्याने केला खून
मयत सोनालीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीच्या निधनानंतर सोनाली ७ वर्षीय मुलासह सोनखेड येथे सासरी राहत होती. तिने स्वतःची शेतजमीन करण्यासाठी मदन भानुदास राठोड (रा. लक्ष्मीनगर तांडा, ता. सोनपेठ) याला दिली होती. दरम्यानच्या काळात सोनालीचे आणि मदनचे अनैतिक संबंध आले. त्यातून सोनाली गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीमुळे मदन गर्भपात करण्यासाठी सतत सोनालीच्या मागे लागला होता. परंतु, सोनाली गर्भपातासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मदनला देत नव्हती. यामुळे संतापलेल्या मदनने दि. ०६ एप्रिल रोजी बहाण्याने सोनालीला अंबाजोगाई जवळील काळवटी तांडा येथील तळ्याची खोरी डोंगर उतारावर नेऊन साडीने गळा आवळून तिचा खून केला. सदर फिर्यादीवरून मदन राठोड याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
सुतावरून गाठला स्वर्ग
सोनालीचा खून केल्यानंतर मृतदेह तिथेच टाकून मदन गावाकडे आला आणि काही झालेच नाही अशा अविर्भावात राहू लागला. दोन महिने उलटूनही कोणालाही काहीच पत्ता न लागल्याने तो निर्धास्त झाला होता. मात्र, अपर पोलीस अधीक्षक नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेंद्र घुगे यांनी सीसीटीएनएस, सोशल मिडिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बारकाईने तपास केला. गळ्यातील एका माळेवरून म्हणजेच अक्षरशः सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी या किचकट प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी रविवारी (दि.१८) मदनाल अंबाजोगाई न्यायालयासमोर हजर केले असता त्यास आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.