Advertisement

शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले - जयंत पाटील

प्रजापत्र | Sunday, 18/06/2023
बातमी शेअर करा

औरंगाबाद  - सरकार आल्यापासून कापसाचे दर १३ हजारावरून साडेसहा हजारावर आले.आज कांदा,टमाटे शेतकऱ्यांना रस्तावर फेकून द्यावे लागले. राज्यातील शेतकरी निवडणुकीची वाटच पहात आहे. शेतकरी आपल्याबद्दल नाराजी व्यक्त करतील, हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांची मते विभागणीसाठी सरकारने राज्यात एक नवीन (बीआरएस)दुकान आणले,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केला.

 

 

    औरंगाबाद येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय कक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, विचारवंत रावसाहेब कसबे, संपादक संजय आवटे, रा.काँ. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संयोजक जयदेव गायकवाड, प्रा. सुनील मगरे, प्रा.प्रतिभा अहिरे,अभिषेक देशमुख आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फुले,शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी समाजसुधारण्यासाठी काम केले. या कामामुळे मुठभर लोकांची अडचण झाली. या सर्व महापुरूषांच्या प्रतिमा मोडल्या पाहिजे यासाठी काम गेले काही दिवस सुरू आहे. कधी राज्यपाल बोलले असतील तर कधी आमदार बाेलले असतील. याचा अर्थ तुमच्याआमच्या श्रद्धेवर हातोडा मारण्याचे काम अप्रत्यक्ष कोणीतरी करतेय.छत्रपती शिवाजी महाराजांसारखी राजवट असती तर, त्या राज्यपालाला मुसक्या बांधून परत त्याच्या राज्यात परत पाठविण्याची व्यवस्था झाली असती. आज येथे विचारवंताची मांदीयाळी सतत व्हायला हवी.अशा शिबिरांचे आयोजन व्हायला हवे, पक्ष तुमच्या पाठिशी आहे, असे त्यांनी नमूद केले.दरम्यान तेलंगणामध्ये कांदा कांद्याचा दर जोपर्यंत तेलंगणामध्ये चांगला आहे तोपर्यत शेतकरी तिकडे जात राहतील. राज्यसरकारने तेलंगणा एवढा दर राज्यात मिळेल यासाठी काळजी घेणे आवश्यक होते. राज्यसरकार कुचकामी असल्याने येथील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. मात्र याचा अर्थ लाेक बीआरएसला मते देतील असा होत नाही,असे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

Advertisement

Advertisement